महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का?- सचिन सावंतांचा खोचक प्रश्न

सुशांतसिंहच्या तपासात बॉलीवुडमधील ड्रग रॅकेट समोर आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे भाजप, गोव्याशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत
सचिन सावंत

By

Published : Sep 24, 2020, 2:09 PM IST

मुंबई-सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवुडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. बॉलिवुडमधील काही कलाकारांची चौकशी होत आहे. असे असले तरी या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या भाजप-बॉलिवुड-सँडलवुड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा संतप्त प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी यांची प्रिय व्यक्ती राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीच्या चौकशीवर सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजपचे बॉलिवुडमधील ड्रग कनेक्शन-

भाजपचे बॉलिवुडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवुड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करु देणार नाही. एका ५९ ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत असताना, याचवेळी कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला १ हजार २०० किलो गांजासह अटक करण्यात आली. याकडे एनसीबीने ढुंकुंनही पाहिले नाही.

कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदीला सँडलवुड ड्रग रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अल्वा हा गुजरात भाजपाचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे.

विवेक ओबेरॉय व संदीपसिंहचे भाजपशी संबंध

विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीपसिंहबरोबर सहनिर्माता आहे. नरेंद्र मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. विवेक हा संदीपसिंहच्या निर्मिती कंपनीत भागीदार आहे. गुजरात राज्य सरकारने संदीप व विवेकच्या कंपनीबरोबर १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. या मोदी बायोपीकचे पोस्टर रिलीज हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास उपस्थितीत करण्यात आले होते. याच संदीपसिंहने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन कोणाला केले होते? संदिप सिंहला मॉरिशसमध्ये एका प्रकरणात कोणी मदत केली होती? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हे सर्व एकमेकाशी संबंधित आहेत. महाराष्ट्र सरकारने या संबंधाची माहिती सीबीआयला दिलेली आहे. परंतु आजपर्यंत या दृष्टीकोनात तपास का केला नाही, याचे आश्चर्य असल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.

एनसीबीच्या ड्रग कनेक्शन चौकशीतून कंगना रणौत गायब?

एनसीबी ड्रग कनेक्शनची पाळेमुळं शोधत असताना गौरव आर्याचे भागीदार कोण आहेत? गोवा अँगल या तपासातून गायब झालेला दिसत असल्याने एनसीबीने उत्तर दिले पाहिजे. एनसीबीच्या ड्रग कनेक्शन चौकशीतून कंगना रणौत गायबच आहे. आपण ड्रग्ज घेत होतो, असे तिने स्वतः कबुल केले आहे. कंगनाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हिडीओ हा पुरावा आहे, असे असताना तिची चौकशी का केली जात नाही. ही चौकशी सुरू असताना कंगना मुंबईत येऊन काही दिवस राहून परत शिमल्याला गेली. पण चौकशीसाठी एनसीबीने तिला का बोलावले नाही? एनसीबी कंगनावर मेहरबान आहे का? का कंगना बॉलिवूडचा भाग नाही? एनसीबी व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीसाठी बोलावत असेल तर कंगनाच्या व्हिडिओकडे डोळेझाक का ? अशी विचारणा सावंत यांनी केली आहे.

एनसीबी कोणाला वाचवण्यासाठी तपास करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही. यासाठीच त्यांना हे प्रश्न विचारत आहोत. ड्रग कनेक्शनसंदर्भात एवढे अँगल असताना त्याकडे एनसीबी दुर्लक्ष का करत आहे असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details