मुंबई - भाजपाकडून आज (सोमवार) राज्यभर मंदिर उघडण्यासाठी निदर्शने केली जात आहेत. तसेच राज्यात सण आणि उत्सवाचे दिवस आहेत. मात्र या सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये राज्य सरकारने काळजी घेतली पाहिजे. उत्सवावर निर्बंध घातले पाहिजेत असे पत्र केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहे. तरीही भाजपाचे नेते आज राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन का करतात? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. याआधीही दुसरी लाट वाढवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले, आता तिसरी लाट आणण्यासाठी देखील भाजपाचे नेते कारणीभूत ठरतील असा टोलाही सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमधून लगावला आहे.
भाजपाचा जनतेच्या जीवाशी खेळ -
राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मंदिरे खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलन केले जात आहे. या आंदोलनांमध्ये कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा मास्क लावत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांना भाजपाचे नेतेचे किंमत देत नाहीत. हे सर्व करून भाजपा नेते केवळ सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.