मुंबई -फडणवीस सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड करता निर्धारीत असलेल्या जमिनीवर, ११ जून २०१९ रोजी मोदी सरकारच्या हाऊसिंग फॉर ऑल २०२२ या महत्त्वकांक्षी योजनेसाठी एक लाख परवडणाऱ्या घरांचा प्रस्ताव स्वीकारला होता. शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने हा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला होता. हा प्रस्ताव स्विकारून त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली होती. या जमिनीवर गरोडीया या बिल्डरचा संबंध प्रश्नांकित असल्याने शापूरजी पालनजी यांच्याबरोबर गरोडीयाने केलेला करार उच्च न्यायालयाने २०१६ साली रद्दबादल ठरवला होता. त्यामुळे सदर जमिनीवरील शापूरजी पालनजी यांचा संबंध नाही याचा विचारही न करता फडणवीस सरकारने सदर प्रस्ताव कसा स्वीकारला असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
यावरून सांवत यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. गरोडीया यांच्याबद्दल भाजपला एवढा पुळका का आला, यातून भाजप सरकार काय साध्य करणार होते. भारतीय जनता पक्षाचे नेते बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का? असे अनेक प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत. मेट्रो-३ कारशेडच्या संदर्भात कांजूरचा आग्रह सोडा असा शाहजोगपणाचा सल्ला फडणवीस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला देत आहेत. मात्र ते शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने तेव्हाच्या शासनाला दिलेला प्रस्तावावर का बोलत नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
कांजूरमार्गच्या जागेचा भाडेकरार केंद्रीय मिठागर विभागाकडून रद्द
यासंदर्भात सचिन सांवत म्हणाले की, कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडची जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे असा निकाल तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहेच. परंतु सदर जमिनीवर केंद्रीय मिठागर विभाग व गरोडिया नावाच्या बिल्डर यांच्यात भाडे करारासंदर्भात न्यायालयात विवाद सुरु आहे. सदर जमीन ही मिठागर विभागाने १९१७ साली ९९ वर्षांच्या करारावर नानभाय भिवंडीवाला यांना दिली होती, ज्याचा करार १६ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला. सदर भाडेकरुशी गरोडीयाचा संबंध नाही, असे मिठागर विभागाचे मत आहे. त्याचबरोबर या जमिनीवर मिठाचे उत्पादन होत नाही या कारणाने २ नोव्हेंबर २००४ रोजी केंद्रीय मिठागर विभागाने हा भाडेकरार रद्द केला होता.त्याला गरोडिया यांनी कोर्टात आव्हान दिले असता कोर्टाने भाडेकरार रद्द करण्यास स्थगिती दिली होती.
शापूरजी पालनजी कंपनीचा प्रस्ताव फडणवीसांनी कसा स्वीकारला?
असे असतानाही २००९ च्या दरम्यान गरोडियाने शापूरजी पालनजी कंपनीबरोबर करार केला व यामध्ये गरोडिया यांना शापूरजी पालनजी कंपनीकडून जवळपास ५०० कोटी रुपये मिळणार होते. शापूरजी पालनजी आणि गरोडीया यांच्यातील हा समझोता करार मुंबई नगर व दिवाणी न्यायालयाने १६ एप्रिल २०१६ रोजी रद्द केलेला आहे. तसेच ९९ वर्षांचा भाडेकरार हा २०१६ रोजीच संपुष्टात आलेला आहे. असे असतानाही ११ जून २०१९ रोजी शापूरजी पालनजी कंपनीचा या जमिनीशी कोणताही संबध नसताना त्यांच्याकडून एक लाख घरांचा आलेला प्रस्ताव फडणवीस सरकारने का स्विकारला? हे बेकायदेशीर कृत्य नव्हते का याचे उत्तर द्यावे. ज्या गरोडीयाचा भाडेकरार रद्द झालेला आहे त्याच्या नावाने भाजपा गळे काढत आहेत. यात भाजपाचे कोणते व्यावसायीक संबंध होते याचे उत्तरही द्यावे. अशी टीका सावंत यांनी केली आहे.