मुंबई-दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. त्यासाठीच खासदार मोहन डेलकर यांना भाजपकडून त्रास देण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.
खासदार मोहन डेलकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सविस्तर माहिती दिली आहे. या पत्रात गेल्या अठरा महिन्यांपासून त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दादर- नगर हवेलीचे प्रशासन, प्रफुल खेडा पटेल आणि काही अधिकारी हे मृत्यूला जबाबदार असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये डेलकरांनी केला होता. डेलकर यांची आत्महत्या झाल्यानंतरही प्रफुल खेडा पटेल यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. पटेल यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
संबंधित बातमी वाचा-खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूस 'या' लोकांना धरले जबाबदार; मुलाची पोलिसात तक्रार
हक्कभंग समितीचा अहवाल सादर करण्याची मागणी
वेळोवेळी होणाऱ्या त्रासाचा माहिती खासदार मोहन डेलकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिली होती. त्यावरच कोणतीच दखल घेतली गेली नसल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी यावेळी केला. तसेच लोकसभा हक्कभंग समिती समोरदेखील त्यांनी तक्रार केली. त्यानंतर डेलकर यांना दिलासा मिळाला नाही, असेही यावेळी सावंत म्हणाले. त्यामुळे हक्कभंग समितीने अहवाल सादर करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.