मुंबई - प्रभादेवी येथील सर्वात जुने असलेल्या साबू सिद्धिकी प्रसुतिगृहाची दुरावस्था झाली आहे. तात्पुरता आधार म्हणून आतील भागात बाबूचा टेकू लावण्यात आले आहेत. मात्र, यामुळे पावसाळ्यात कोणती दुर्घटना घडली तर कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
साबू सिद्धिकी प्रसुतिगृह बांबूच्या आधारावर उभे आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रसुतिगृहाचे लवकर नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत. प्रसुतिगृह सध्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रुग्णालयाला बांबूचा आधार दिला असून छताचे प्लास्टर निघालेले आहे, ते कधीही पडू शकते. या प्रसुतिगृहाच्या पाठीमागे असलेली परिचारिका निवासगृहाची देखील दुरवस्था झाली आहे. वरळी, प्रभादेवी, दादर परिसरातील नागरिक या प्रसुतिगृहात प्रसुतिसाठी आणि नवजात बालकाच्या उपचारासाठी येत असतात. यापूर्वी याठिकाणी प्रसुतिगृहाच्या बंद असलेल्या मजल्यावर बाल रोग चिकित्सालय सुरू करण्यात येणार होते. ते अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही.