मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. भाजप प्रणित भक्तांनी मोदी प्रेमापोटी केलेल्या या प्रकारानंतर सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी शिवभक्तांनी याला विरोध केला. तसेच महाविकास आघाडीने देखील या विरोधात आंदोलन केले. यादरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनीही छत्रपतींच्या वंशजांवर तोंडसुख घेतले. काल (14जानेवारी) उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना 'राजे स्टाईल'ने प्रत्युत्तर दिले.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून उदयनराजे भोसले यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करण्यात आलय.
शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी आणि शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, असे 'सामना'तून ठणकावण्यात आले आहे. यासाठी माजी पंतप्रधान पंडीत नेहरू आणि मोरारजी देसाई यांचा संदर्भ देत, त्यांनाही शिवरायांपुढे झुकावे लागल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अग्रलेखातून लेखक जय भगवान गोयल यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. हा माणूस खोट्या प्रसिद्धीचा भुकेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जेएनयुमधील देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गृहमंत्री अमित शाह हे अटक करण्याचे आदेश देणार होते. आता हाच नियम भावना भडकवणाऱ्या या लेखकाला लागू करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना जाणता राजा कसे म्हटले जाते, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर भाष्य करताना, शिवाजी महाराजांना रयतेचा राजा संबोधण्यात यायचे, असे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच शरद पवार यांना जाणता म्हणून नरेंद्र मोदींनीच संबोधल्याचा अग्रलेखात उल्लेख आहे.