मुंबई -काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, याबाबत आमचेही वेगळे मत नाही, असे म्हणत पुरोगामी लोकशाही आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदावर शिवसेनेने पुन्हा एकदा राग छेडला आहे. त्याचवेळी देशात भाजपविरोधात असंतोष वाढत आहे. लोकांना पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. राज्याराज्यात प्रादेशिक पक्षांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या पक्ष नेतृत्वाचे मन वळवण्याचे काम कोण करणार, असा सुचक सवाल शिवसेनेने केला आहे.
विखुरलेला विरोधीपक्ष एका झेंड्याखाली यावा
शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. सोमवारी काँग्रेसचा १३६ वा वर्धापन दिन होता. त्याच बरोबर मागील काही दिवसांपासून यूपीए अध्यक्षपदी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पवारांनी ही चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी देखील पवारांना कामाचा व्याप मोठा असून त्यांनाही या पदामध्ये रस नसणार असे म्हटले होते. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी काँग्रेसने काय करावे हे शिवसेनेने सांगू नये, असे म्हटले होते. यावर शिवसेनेने अग्रलेखातून सूचक वक्तव्य केले आहे. 'विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपसमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंड्याखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा?' असा सवाल शिवसेनेने केला आहे.
प्रादेशिक नेतृत्वाचे मन वळवण्याचे काम कोण करणार?
कर्नाटकात २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक आहे. येथे जनता दल सेक्युलर (जेडीएस) स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे. याआधी कर्नाटकात काँग्रेसने जेडीएस नेते माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. आता या दोन्ही पक्षात दरी आहे. देवेगौडा यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. असा इशाना सामनातून देण्यात आला आहे. अशीच परिस्थिती इतर राज्यातही आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजप विरोधकांचे डोळे उघडणारे आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार अस्वस्थ आहेत. ईशान्येकडील राज्यात काँग्रेस बलदंड पक्ष होता. आज चित्र बदलले आहे. ख्रिश्चन, आदिवासी मतदारांचे प्राबल्य असूनही ईशान्येत भाजपला मोठे यश मिळत आहे. काँग्रेसचा परंपरागत दलित, मुसलमान, आदिवासी, ओबीसी मतदार इकडेतिकडे गेला आहे. याचाही दाखला सामनातून देण्यात आला आहे. राज्याराज्यात प्रादेशिक पक्षांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या या पक्ष नेतृत्वाची अस्वस्थता ओळखून त्यांचे मन वळवण्याचे काम कोण करणार, असा सुचक प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.
हेही वाचा -'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताचा डंका, ८ गडी राखून नोंदवला विजय