मुंबई- शायर, गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली आहे. त्यावरुन वादंगही सुरु आहे. भाजप आणि संघाशी संबंधीत संघटनांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात आवाज उठवलेला असताना शिवसेनेनेही जावेद अख्तर यांच्या भूमिकेला नापसंती दर्शवत त्यांनी संघ आणि तालिबानची केलेली तुलना अमान्य केली आहे. पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून, 'संघाविषयी मतभेद असले तरी...' या अग्रलेखातून शिवसेनेने अख्तर यांनी रास्व संघाची तालिबानशी केलेली तुलना अमान्य केली आहे. तसेच जावेद अख्तर यांच्या सडेतोड भूमिकेचे कौतूक करुन त्यांनी अनेकदा धर्मांधाचे मुखवटे फाडले असल्याचेही म्हटले आहे.
'सध्या आपल्या देशात कोणीही कोणाला तालिबानी म्हणत आहे. कारण अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट म्हणजे समाज व मानवजातीला सगळय़ात मोठा धोका आहे. पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांनी तालिबानी राजवटीचे समर्थन केले; कारण या दोन्ही देशांत मानवी हक्क, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे काहीच मूल्य राहिलेले नाही. हिंदुस्थानची मानसिकता तशी दिसत नाही. एकतर आपण कमालीचे सहिष्णू आहोत. लोकशाहीच्या बुरख्याआड काही लोक दडपशाही आणू पाहत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच.' असे जोर देऊन शिवसेनेने म्हटले आहे.
हेही वाचा : जावेद अख्तर यांनी तालिबानची केली आरएसएससोबत तुलना
जावेद अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत तरी...
''तालिबानचे हे कृत्य रानटी असून ते निंदनीय आहे. त्याप्रमाणे आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे समर्थन करणाऱयांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीची आहे, या विचारधारेचे समर्थन करणाऱया लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,'' असे मत ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी मांडले आहे व त्याबद्दल काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण यावर जावेद यांनी कठोर प्रहार केले आहेत. देशात जेव्हा जेव्हा धर्मांध, राष्ट्रद्रोही विकृती उसळून आल्या त्या प्रत्येक वेळी जावेद अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी 'वंदे मातरम्'चे गान केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही.' असे सांगत शिवसेनेने, 'संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे. संघाची भूमिका व त्यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात आणि हे मतभेद जावेद अख्तर वारंवार मांडत असतात. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे म्हणून 'हिंदू राष्ट्र' संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल?' असा तर्क मांडला आहे.
'अफगाणिस्तानात निर्घृण तालिबान्यांनी जो रक्तपात, हिंसाचार घडविला आहे व मनुष्यजातीचे पतन चालविले आहे, ते काळजाचा थरकाप उडविणारे आहे. तालिबान्यांच्या भीतीने लाखो लोकांनी देश सोडला आहे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अफगाणिस्तानचा नरक बनला आहे. तालिबान्यांना तेथे फक्त धर्माचे म्हणजे शरीयतचेच राज्य आणायचे आहे. आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान व हिंदुस्थान ही दोन राष्ट्रे बनल्यावर हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात सातत्याने डावलले जाऊ नये, हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती असून त्यावर आक्रमण करणाऱयांना रोखण्याचे हक्क ते मागत आहेत. अयोध्येत बाबरी पाडण्यात आली व तेथे राममंदिर उभे राहत आहे, पण आजही बाबरीसाठी जे हिजडेगिरी करीत आहेत त्यांचा बंदोबस्त करा व तो कायद्याने करा, असे कोणी म्हणत असतील तर ते तालिबानी कसे?' असा सवाल शिवसेनेने केला आहे.