मुंबई - फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम -दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे! असा खोचक सल्ला सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आला आहे.
...तर त्यात गैर काय?
शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोनेक दिवस चर्चा तर होणारच. पवार हे शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथे खास विमानाने गेले. त्यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल होते. एका बड्या उद्योगपतीच्या घरी ते मुक्कामाला होते. हे बडे उद्योगपती कोण हेसुद्धा उघड आहे. त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहोचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला. देशाचे गृहमंत्री जे कोणी असतील, ते त्यावेळी अहमदाबादेत असतील. ते आणि शरद पवारांसारखे नेते हे समजा एकमेकांना भेटत असतील तर त्यात गैर काय? पण त्यासाठी रात्रीच्या अंधारात रहस्यमय पद्धतीने कोण कशाला भेटतील? ज्या उद्योगपतीच्या घरी ही भेट वगैरे झाल्याचे सांगितले जाते त्याची गुप्त घरे दिल्ली-मुंबईतही आहेत व ही गुप्त भेट अहमदाबादपेक्षा मुंबई-दिल्लीतच अधिक सोयीची झाली नसती काय? असा प्रश्नही अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय.
न झालेल्या भेटीबद्दल शहा यांनी पतंग उडवले
पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांनी पतंग उडवले. पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारले तेव्हा शहा म्हणाले, ''अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात.'' महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की, ''मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य,'' असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आलेच अशा थाटात काहीजण वावरू लागले. शरद पवार यांनी शहांची भेट घेतली की नाही हा प्रश्न सोडा, पण विरोधी पक्ष सत्तेसाठी कसा उतावीळ होऊन वळवळ करीत आहे, ते या निमित्ताने दिसले. मुळात राजकारणात आता काहीच गुप्त वगैरे नसते. जे गुप्त असते ते सगळय़ांत आधी सार्वजनिक होते. शहा-पवारांची बैठक गुप्त होती तर मग बातमी फुटली कशी? अशी विचारणाही करण्यात आली आहे.