मुंबई -योगी महाराजांना मुंबई महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोण म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सामना आग्रलेखातून लगावण्यात आला आहे. एक नटीने मुंबई तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची प्यारी बहना झाली. भाजपच्या त्याच नटीने पीओके म्हटलेल्या मुंबईत भाजपचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या पीओके ची कायदा- सुव्यवस्था मिर्झापूर पेक्षा वेगळी नाही. उत्तर प्रदेशाची बदनामी थांबवा, कायदा सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल असा सल्ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आला आहे.
काय म्हणाले होते योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई भेटी फिल्म सिटी बद्दल वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी आम्ही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण सुविधा आणि सुरक्षा देईल, अशी ही स्पर्धा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचा चांगलाच समाचार सामनातून घेण्यात आला आहे.
योगींना प्रत्युत्तर
योंगीचा विचार चांगला आहे. तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा. पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नातच उत्तर दडले आहे. फिल्म सिटी मुंबईतच का फोफावली, वाढली आणि बहरली याचा विचार करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. शिवाय फिल्म सिटीच काय तर, मुंबईसारखे रोजगार देणारे दुसरे शहरच उत्तर प्रदेशात उभारावे. सध्या उत्तर प्रदेशाची स्थिती बिकट आहे. उद्योग नाहीत. आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा वेळी रोजगाराचे काय? यासाठी मिर्झापूर ही वेबसीरीजचा आस्वाद घेतला पाहिजे.
मिर्झापूर उत्तर प्रदेशचे वास्तव
मिर्झापूर वेबसीरीजमध्ये उत्तर प्रदेशचे वास्तव दाखवण्यात आले आहे. मुंबईतले अंडरवर्ल्ड महाराष्ट्राने मोडून काढले. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये दाखवलेले वास्तवही बदलण्याचे काम योगी सरकारचे आहे. त्यांनी ते आधी करावे. फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून आत बगीचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार? मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू खार या परिसरात मायानगरी वसली आहे. मग इथली खरीखुरी मायानगरी मिर्झापूरला हलवणार आहात काय ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशला सोन्याने मढवा. त्यासाठी लागणाऱ्या विटा दिल्लीतून घेवून जा. पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता ? मुंबईला का ओरबाडता ? मायानगरी तर दक्षिणेतील राज्यातही आहे. मग योगी महाराज तिथेही जाणार आहेत का असा सवालही करण्यात आला आहे. गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण मिर्झापूर १ आणि २ मध्ये करण्यात आले होते. तेच वास्तव असल्याचेही म्हटले जाते. आता मिर्झापूर ३ ची निर्मिती नव्या मायानगरीत होत असेल तर आनंदी आनंदच आहे असे ही म्हटले आहे.
हेही वाचा - योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर, वातावरण तापले; मनसे, शिवसेना, काँग्रेसकडून लक्ष्य
सामनाच्या अग्रलेखावरून दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
मुख्यमंत्री योगींच्या मुंबईत येण्यावरून सामनामध्ये जोरदार टीका झाली. यानंतर आता महाराष्ट्राच्या आणि उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनी 'अभिनेता अक्षय कुमार यांना आंब्यांमध्ये रस असावा. त्यांना उत्तर प्रदेशात आंबे खायचे असतील. म्हणूनच ते पंतप्रधान मोदींनाही आंबे खाण्याबद्दल विचारत होते,' अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर, उत्तर प्रदेशचे मंत्री सिंह यांनी सामनामध्ये योगींच्या मुंबईत येण्यावरून अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच, शिवसेनेला खुली किंवा सर्वांना पुढे घेऊन जाणारी स्पर्धा करण्यात रस नाही. तर, 'वेगळ्या प्रकारच्या स्पर्धे'त रस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेची संस्कृतीच अशा प्रकारची असल्याची घणाघाती टीका सिंह यांनी केली. तसेच, उत्तर प्रदेशची कायदा आणि सुव्यवस्था चांगली असल्यामुळेच तेथे उद्योग-धंदे आणण्यात आणि चित्रनगरीमध्ये गुंतवणूक करण्यात उद्योजकांना रस असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
सामनाच्या अग्रलेखावरून दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप