मुंबई - श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी 'भारत जोडो' यात्रा काढली होती. त्याचे सारथ्य करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. अतिरेक्यांच्या गोळ्यांची, बॉम्बची पर्वा न करता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविणारे नरेंद्र मोदीच होते. तिरंग्याविषयीच्या त्यांच्या भावना ज्वलंत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत. मूळ मुद्दा इतकाच की, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा तथाकथित अपमान करणाऱ्यांचे धागेदोरे नक्की कोठपर्यंत पोहोचले आहेत ते समोर आणा. दुसरे असे की, न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हासुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. अशा शब्दात सामनातून लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाल्याचा काहूर माजवणाऱ्यांना सामनातून फटकारले आहे. सामनाचा रोख भाजपाच्या सोशल मिडीयाकडे दाखवताना चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून बसले हादेखील तिरंग्याचाच अपमान आहे साहेब! अशा शब्दात मोदींनाही डिवचण्यात आले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
लाल किल्ल्यावर शेतकऱयांच्या एका गटाने गोंधळ घातला. त्यात जो तिरंग्याचा अपमान झाला त्यामुळे आपले प्रिय पंतप्रधान मोदी अत्यंत दुःखी झाले आहेत. 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधानांनी त्यांचे मन मोकळे केले. '26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुःखी झाला', अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांचे असे म्हणणे असेल तर ते योग्यच आहे. देशातल्या सवाशे कोटी नागरिकांच्या भावना याच आहेत. तिरंग्याचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान असतो. सीमेवर तैनात सुरक्षा दलाचे बजेट या वर्षी 7.1 टक्क्यांनी वाढवले आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंदुस्थान-तिबेट सीमा पोलीस दलासाठी नव्या अर्थसंकल्पात 1 लाख तीन हजार 803.52 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली, ती फक्त तिरंग्याचा सन्मान करण्यासाठीच. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले
पण 26 जानेवारीस म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे? साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱया शेतकऱयांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले. तिरंगा आम्हाला 'जान से प्यारा' आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱ्यांना प्यारा आहे. तिरंगा अपमानित करून कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी? पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे.