मुंबई-शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय फडणवीस यांना माहीत नाही? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेडय़ा पडतीलच. निश्चिंत रहा! असे आश्वासनच सामनातून भाजपाला देण्यात आले आहे. शर्जिलला अटक करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. त्या पार्श्वभूमिवर सामनाच्या अग्रलेखातुन विरोधकांना निश्चिंत करण्यात आले आहे. ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले! असा सल्ला ही या निमित्ताने भाजपाला देण्यात आला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. 'एल्गार' नावाची एक टोळधाड पुण्यात जमा केली जाते. त्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडकवीच केली जाते. नाव एल्गार, पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या. तो कोणीएक शर्जिल उस्मानी तेथे आला व त्याने आपल्या देशातले हिंदुत्व कसे सडले आहे यावर प्रवचन झोडले. त्यावर भाजपने आता आरोळ्य़ा ठोकायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वासाठी रस्त्यावर येऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. उस्मानी जे बरळला ते गंभीर आहे. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, असा आतडी पिळवटून टाकणारा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते तळमळीने सांगतात, ''एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे, समस्त राज्याची चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे.'' फडणवीस यांचे म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची 'मन की बात'च जाहीर केलीत. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळय़ांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही.
त्या हिंदु शेतकऱ्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा?
हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी 90 दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱयांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा. रस्त्यावरचा शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आता त्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळय़ांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱ्यांचा सन्मान म्हणावा काय? या शेतकऱ्यांनी तर कोणताही गुन्हा केलेला नाही. भाजप पुढाऱ्यांनी रस्त्यावरच्या या हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल.