मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात डिसंबर महिन्यात मुदतपुर्व निवडणूका होतील आणि त्यानंतर भाजपचे सरकार येईल, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सामनातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. तसेच, राज्यात डिसेंबरमध्ये निवडणूका होतील, असे बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी तशी कृती करूनच दाखवावीच असे आव्हान सामनातून देण्यात आले आहे.
पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी 'ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल तर असे काही होणार नाही. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे लोक ठरवतील', असे वक्तव्य केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जेमतेम कामाला सुरुवात करत असताना, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. यावरूनच सामनातून चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावण्यात आले आहेत.
पाटील यांचे वक्तव्य हे पोपटवाल्याचे भविष्य नसुन गर्भित धमकी...
चंद्रकांत पाटील यांनी, राज्यांच्या मुदतपुर्व निवडणूकांबाबत जे वक्तव्य केले आहे, ते कोणा पोपटवाल्याने वर्तवलेले भविष्य नसून एक प्रकारची धमकी असल्याचे सामनातून सांगण्यात आले आहे. 'राज्यात महाविकास आघाडीचे बहुमताचे सरकार आहे. तिन वेगवेगळ्या पण महाराष्ट्राच्या विचाराचे सरकार सत्तेवर आहे. त्यांची आपापसात कुरबुर नाही. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालेल' असा विश्वास सामनातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ राज्यातील हे सरकार कसे पाडायचे आणि मुदतपुर्व निवडणूका घ्यायच्या, याबाबत कारस्थान शिजवले जात आहे काय? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा.....तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत
... तर त्यांना महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसावा लागेल
पाटील यांच्या विधानाचा अर्थ लावताना सामनातून, कदाचित भाजपच्या अंतःस्थ गोटात राज्यात मुदतपूर्व निवडणूका घ्यायचे ठरले आहे काय? असा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यावर जर चंद्रकांत पाटील आणि भाजपला तसे करायचे असेल तर त्यांना अगोदर संसदीय लोकशाहीचा गळा घोटावा लागेल आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसावा लागेल, असे म्हटले आहे. परंतु असे कोणतेही कृत्य महाराष्ट्र सहन करणार नाही. त्यामुळे राज्यात आगडोंब उसळेल, असा इशाराही देण्यात आला आहे.