मुंबई - विधान परिषद निवडणूक निकालात महाविकास आघाडीची सरशी झाली. त्यानंतर सामनातून भाजपला डिवचण्याची संधी शिवसेनेने सोडली नाही. आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. असे चंद्रकांत पाटील म्हणतात. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. असे म्हणत शिवसेनेने भाजप आणि त्यातून चंद्रकांत पाटलांना टोला हाणला आहे.
भाजपने धडा घ्यावा
काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी एकत्र लढली यापेक्षा एकदिलाने लढली हे महत्त्वाचे. भाजप-शिवसेना एकत्र लढत होते तेव्हा शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता, असा आरोपही आग्रलेखातून करण्यात आला आहे. आता तिघात तसे झाले नाही. यापासून धडा घ्यायचा आहे तो भाजपने, असा सल्लाही ही देण्यात आला आहे.
ही तर बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल
नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल आहे. वाऱयाने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे. नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच आहे.
...तर मग ईव्हीएम घोटाळय़ातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही, अशी वचवच सुरू आहे. लाखो शिक्षक व पदवीधरांनी दिलेले मत कौल नसेल तर मग ईव्हीएम घोटाळय़ातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय? पुणे व संभाजीनगरचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लाखावर मतांनी जिंकले आहेत. शिक्षक मतदारसंघात पन्नास हजारांवर मतांनी जय झाला आहे. विदर्भातील विजय त्यादृष्टीने जास्त महत्त्वाचा. काँग्रेसचे सर्व गट-तट, नेते मंडळी एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतो ते दिसले. या विजयातून दिल्लीतील मरगळलेल्या काँग्रेस हायकमांडनेही बोध घ्यायला हवा.
भाजपा अंतर्गत कलहाने जर्जर
भाजपचे गड एकजुटीने पाडले जाऊ शकतात. महाराष्ट्रात ते दिसले. महाराष्ट्रातील भाजप लोकांपासून, समाजातील सर्वच घटकांपासून दूर जातो आहे. पक्ष संघटना अंतर्गत कलहाने जर्जर झाली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या हाती भाजपची सूत्रे आहेत. ही दिल्लीश्वरांची इच्छा, पण जनतेची इच्छा काय ते नागपूर, पुणे, औरंगाबादच्या पदवीधर व शिक्षकांनी दाखवून दिले आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातही ‘जात’ हाच आधार मानून उमेदवाऱ्या दिल्या. भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली.
एक वर्षात दोन सुतक लागणे चांगले नव्हे
महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱयांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. ‘‘आम्हीच येणार व आम्हीच जिंकणार’’ हा तोरा बरा नाही. ‘‘विधान परिषदेच्या सहापैकी सहा जागा जिंकू’’, अशा आरोळय़ा चंद्रकांत पाटील ठोकत होते. शरद पवार हे लोकनेते नाहीत असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा लोकांनीच त्यांना खाली पाडले. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.
हेही वाचा- मुख्यमंत्री आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर
हेही वाचा -विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबीज