मुंबई- भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. दोन्ही पक्षांनी समझोता करुन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. युतीचा निर्णय झाला असताना दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.
निवडणुकीपूर्वी एखादा दहशतवादी हल्ला होईल व त्यानंतर एखादे छोटे युद्ध खेळून निवडणुका जिंकल्या जातील, असा राजकीय आरोप काही दिवसांपूर्वीच झाला. अशा आरोपांना पुष्टी मिळेल असे वर्तन राज्यकर्त्यांनी करू नये. लोकांच्या मनातील खदखद लाव्हारसाप्रमाणे उसळून बाहेर येईल व त्यांना आवरणे कठीण जाईल. दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये. तसे कोणी करीत असेल तर ईश्वर त्या सर्वच राजकीय पक्षांना सुबुद्धी देवो, असे म्हणत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.
देशात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. कश्मीर हल्ल्यानंतर वातावरणातील तणाव वाढला. देशभक्ती किंवा राष्ट्रवाद अंगी बाणवण्यासाठी कश्मीरसारख्या दहशतवादी हल्ल्यांचीच का गरज असावी? गावागावांत, शहरांत देशभक्तीच्या गर्जना करणारे जमाव जमत आहेत. दिल्लीच्या इंडिया गेटवर कालच्या रात्री हजारो तरुण अमर जवान ज्योतीजवळ जमले. जवानांचे रक्त सांडल्याशिवाय देशभक्तीचा अंगार पेटत नाही. एखादा दहशतवादी हल्ला झाल्याशिवाय आमच्या देशभक्तीस जाग येत नाही. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी असे हल्ले होण्याची वाट का पाहावी लागते? हे काम कधीच व्हायला हवे होते. आता ‘पुलवामा’ हल्ल्यानंतर तरी विद्यमान सरकारने पाकिस्तानला धडा शिकविण्याचे कर्तव्य पार पाडावे ही जनभावना आहे. यात थोडाफार राजकीय रागरंग मिसळला जातोच. मात्र एखाद्याच्या देशभक्तीपेक्षा दुसर्याची देशभक्ती प्रखर यावर सोशल मीडियात स्पर्धा होऊ नये. दुसरीकडे या हल्ल्याच्या निमित्ताने देशभरात जो तीव्र संताप व्यक्त होत आहे त्या संतापाच्या भरात एखादा भलताच गंभीर प्रश्न उभा राहील असे होऊ नये. कारण आम्ही बातम्यांतून पाहात आहोत, पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील कश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू झाले आहेत. हे चिंताजनक तितकेच धोकादायक ठरू शकेल. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत शिखांचे हत्याकांड झाले. त्याची किंमत काँग्रेस पक्षाला आजही चुकवावी लागत आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
नवज्योतसिंग सिद्धू हा एक बेलगाम बोलणारा माणूस आहे, पण हे मूळ ‘प्रॉडक्ट’ भारतीय जनता पक्षाचेच आहे. पुलवामातील हल्ल्याने देशात संतापाचा भडका उडाला असताना या महाशयाने वक्तव्य केले की, ‘काही झाले तरी पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवली पाहिजे.’ या वक्तव्यामुळे नवज्योतसिंग सिद्धूची ‘सोनी’ टी.व्ही.च्या एका कार्यक्रमातून हकालपट्टी झाली व तसा दबाव व मोहिमा चालवल्या गेल्या, पण त्याच वेळी उत्तरेतील एक भाजप नेते नेपाल सिंग यांनी शहीद सैनिकांचा अपमान केला. ‘सैनिक मरत असतील तर मरू द्या, त्यांना त्याचाच तर पगार मिळतो ना?’ ही असली फालतू वक्तव्ये करणारा नेपाल सिंग मात्र आजही भारतीय जनता पक्षात आहे व त्याच्यावर कारवाई झालेली नाही, याकडे अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले.