अनिष्ट प्रथा रोखणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ - कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायत बातमी
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केलेला अनिष्ट प्रथा विरोधी ठराव राज्यभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच अनिष्ट प्रथा रोखणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली.
मुंबई -कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील ग्रामपंचायतीने विधवा महिलांना पतिनिधनानंतर मिळणारी वागणूक बंद व्हावी आणि त्यांचा सन्मान व्हावा, या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले. विधवा महिलांना त्यांचे सौभाग्यलेणे वापरता येत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ग्रामस्थांच्या सोबत मिळून ग्रामसभेत ठराव केला आणि अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. हेरवाड ग्रामपंचायतीचा हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आणि पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा असून हा निर्णय राज्यभरात राबवण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. अशा पद्धतीचे परिपत्रक सर्व ग्रामपंचायतींना पाठवले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
अनिष्ट प्रथा बंद करणाऱ्या ग्रामपंचायतीला प्रोत्साहन -अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबत गावकर्यांमध्ये जनजागृती करावी आणि महिलांना सन्मानजनक वागणूक मिळावी यासाठी या निर्णयाला मदत करावी यासाठी गटविकास अधिकारी आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. ज्या ग्रामपंचायती या निर्णयाला मदत करतील आणि विधवा महिलांना सन्मानजनक वागणूक देतील अशा ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.