मुंबई - परदेशात कोरोना विषाणूचे नवीन प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाईन केले जाणार असून त्याची अंमलबजावणी ३ सप्टेंबरपासून केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१४ दिवस होम क्वारंटाईन
सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची (institutional quarantine) तरतूद रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. चाचणीच्या अनुषंगाने, याआधीच्या परिपत्रकानुसार दोन्ही कोविड डोस झालेले प्रवासी, ६५ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांचा अपवाद वगळता सर्वाना चाचणी बंधनकारक होती. आता यात बदल करून सर्वांना चाचणी बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांनी विहित नमुन्यातील सेल्फ डिक्लरेशन तसेच हमीपत्र (undertaking) भरुन मुंबई विमानतळावर नियुक्त संबंधित अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक असेल आणि या प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक असणार आहे.