मुंबई- मुंबई महापालिकेचे कुर्ला येथे भाभा रुग्णालय आहे. या रुग्णालयातील ईएमएस आयसीयू खासगी संस्थेमार्फत चालवला जातो. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून येथील ईएमएस आयसीयू विभाग बंद आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना अडचणी निर्माण येत आहेत. त्यामुळे महापालिकेने आता हा ईएमएस आयसीयू ताब्यात घेऊन सुरू करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. तर दुसरीकडे पालिका प्रशासन कंत्राटदारांपुढे हतबल झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केला आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका आपल्या तसेच खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. पालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असले तरी काही पालिका रुग्णालयातील ईएमएस आयसीयू बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे हे ईएमएस आयसीयू पालिकेने खासगी संस्थांना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या नावाखाली चालवण्यास दिले आहेत. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ईएमएस आयसीयू बंदच आहेत. हे ईएमएस आयसीयू कंत्राटदार चालवत नसल्याने कोरोनाच्या रुग्णांना आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळत नाही. यामुळे पालिकेने हे ईएमएस आयसीयू ताब्यात घेऊन स्वता चालवावे, अशी मागणी कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. कृष्णकुमार पिंपळे, आमदार मंगेश कुडाळकर तसेच पालिका आयुक्तांकडे केली असल्याची माहिती गलगली यांनी दिली.