मुंबई -बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आयपीएलची ( IPL Start From Today ) उत्कंठा शिगेला पोहचलेली असताना त्याचा थरार आजपासून सुरू होत आहे. मुंबईपासून पुण्यापर्यंत हा रणसंग्राम रंगणार असला तरीसुद्धा आयपीएलच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस बंदोबस्ताची मागील थकबाकी ( Pending Arrears Of IPL Security ) न अदा करता, पुन्हा आयपीएलसाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली ( Police Security For IPL ) आहे. यावरून आता आयपीएलचा वाद पुन्हा समोर आला आहे. वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे.
३५ स्मरणपत्रांना केराची टोपली -मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे १४.८२ कोटी रुपये थकविले असून पोलिसांच्या ३५ स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली आहे. थकबाकी वसूल न करता आयपीएल क्रिकेट सामन्यास सुरक्षा देत मुंबई पोलिसांनी उदारपणा दाखविला आहे. असा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
विविध सामन्यांचे कोटी रुपये थकीत -मुंबई पोलीस हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३५ स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या ८ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष २०१३ मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष २०१६ चा विश्वचषक टी -२९, वर्ष २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे १४ कोटी ८२ लाख ७३ हजार १७७ रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या ८ वर्षात फक्त २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर ९.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे.