मुंबई - मुंबई महापालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिका नाही. 5 तासांच्या विलंबानंतर स्थानिक एनजीओची रुग्णवाहिका मिळाल्यानंतर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
चौकशी करून, कारवाई करा -
मुंबई महापालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने शवविच्छेदनास उशीर झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 5 तासांच्या विलंबानंतर स्थानिक एनजीओ तर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्यानंतर मृत चंद्रकांत मदने यांचाम मृतदेह राजावाडी येथील शवविच्छेदन केंद्रात पाठविण्यात आला. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांस लेखी तक्रार केली आहे.
कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने शवविच्छेदनास उशीर अर्थसंकल्पात आरोग्य विभागावर कोट्यवधीची तरतूद-
चंद्रकांत मदने यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेह राजावाडी शवविच्छेदन केंद्रात घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका नव्हती. 5 तास प्रतीक्षा केल्यानंतर नातेवाईकांनी मनराज प्रतिष्ठानकडे रुग्णवाहिकेची मदत मागितली आणि मदत मिळाली. अनिल गलगली यांच्या मते नुकत्याच अर्थसंकल्पात आरोग्य विभागावर कोट्यवधीची तरतूद करण्यात आली आहे. असे असताना रुग्णालयात रुग्णवाहिकेसारखी व्यवस्था नाही. कुर्ला सारख्या गजबजलेल्या रुग्णालयात साधन सामुग्री असणे आवश्यक आहे. सदर प्रकरणाची चौकशी करत संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.