मुंबई - दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आरएसएसला पालिकेने काही जागा दिली होती. मात्र, त्याच बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असलेले स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. यामुळे भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत असल्याने इतर ठिकाणी भूखंड द्यावा, अशी मागणी आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पालिकेला ( Rss space land demand bmc ) दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा -भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवले, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू
आरएसएसचे भाडे थकले - जी / उत्तर विभाग दादर ( प ) शिवाजी पार्क येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नावे व्ही.एल.टी. तत्वावर १ हजार ७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा वर्ष १९६७ पासून महापालिकेने दिलेला आहे. वर्ष १९६७ पासून वर्ष २००७ पर्यंत आम्ही मोकळ्या भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे भूभाडे ( VLT RENT ) भरलेले आहे. त्याच्या पावत्या सोबत जोडत आहोत. प्रशासकीय अधिकारी ( मालमत्ता ) जी / उत्तर विभाग यांनी वर्ष २००८ पासून भूभाडे घेण्यापूर्वी जागेचे आरेखन करण्यासाठी आग्रह धरल्याने व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आजतागायत जागेचे आरेखन न झाल्याने प्रशासकीय कारणास्तव वर्ष २००८ पासून आजतागायत भूभाडे थकीत आहे. आम्ही हे भूभाडे भरण्यास तयार आहोत व यापूर्वीही वारंवार भूभाडे भरण्यासाठी प्रशासकीय अधिकारी ( मालमत्ता ) जी / उत्तर विभाग यांच्याकडे गेलो असता ते आरेखनाशिवाय स्विकारण्यास असमर्थता दर्शवली. या एकाच कारणामुळे भूभाडे थकीत राहिले आहे, असे आरएसएसने आपल्या पत्रात म्हटले आहे.
इतर ठिकाणी भूखंड द्या - वर्ष १९३६ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनंदिन शाखा शिवाजी पार्क मैदानात लागते. वर्ष १९६७ पासून व्हिएलटी (VLT) भूखंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वितरित केलेला आहे. या १ हजार ७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचे भूभाडे वर्ष २००७ पर्यंत भरलेले आहे. या व्ही.एल.टी. भूखंडाचा मालमत्ता कर ०१.०४.१९६७ पासून वर्ष २०२१-२२ पर्यंत भरलेला आहे. याबाबत कागदपत्रे सोबत जोडीत आहोत. आमच्या सध्याच्या व्हिएलटी (VLT) भूखंडाजवळ स्मृतीस्थळ आल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील व्हिएलटी (VLT) भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत. तसेच, स्मृती स्थळामुळे जागेचे आरेखन करणे जिकिरीचे होईल असे वाटते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही सदर जागेचे थकीत भूभाडे (VLT RENT) तातडीने स्वीकारण्यात यावे. तसेच, स्मृतीस्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना नानी पार्क जवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा, अशी मागणी आरएसएसकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल