मुंबई - राज्यसभा उमेदवार ( RS Election 2022 ) निवडून येण्यासाठी ते 42 मतांचा कोटा प्रत्येक उमेदवाराला लागणार आहे. त्यामुळे आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी 42 मतं निश्चितपणे उमेदवाराला मिळतील याची काळजी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष घेत होते. मात्र, आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी घेतलेल्या रणनीतीत बदल करून हा कोटा 44 केल्याची माहिती समोर येत आहे. 44 मतदान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांच्या उमेदवाराला दगाफटका झाल्यास त्याचा थेट फटका महाविकास आघाडीच्या चौथ्या आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून 44 मतांचा कोटा आपल्या उमेदवाराला देऊन त्यांचा विजय निश्चित करण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून केला जातोय. जेणेकरून मतदान करताना काही कारणावरून एखाद-दुसरं मत बाद झालं तर, काँग्रेसचे इमरान प्रतापगडी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना कोणताही धोका होऊ नये. त्यांचा विजय निश्चित व्हावा यासाठी हा कोटा दोन्ही पक्षाकडून वाढवण्यात आल्याचे समजते.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या निर्णयाने शिवसेना नाराज? :गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकासआघाडी रणनीती ठरवली गेली. यातून महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांना पहिल्या पसंतीच्या मताने विजय मिळेल. याबाबत रणनीती होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने 42 चा कोटा 44 वर नेल्यामुळे आता चौथ्या उमेदवारासाठी दुसऱ्या पसंतीच्या मताची देखील दक्षता महाविकास आघाडीला घ्यावी लागणार आहे. रणनीतीत झालेल्या बदलामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन्ही पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. मात्र तिन्ही पक्षाकडून संजय राऊत, प्रफुल पटेल आणि इमरान प्रतापगडी यांच्या विषयी मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर राज्यसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे निरीक्षण करणारे नेते मतांची पुन्हा एकदा गोळाबेरीज करून चौथ्या उमेदवाराच्या मतदानाची रणनीती आखणार आहेत. जेणेकरून महाविकास आघाडीचा चौथा उमेदवारही विजय होईल. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदारांच्या मताचा कोटा बदलल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून जाहीरपणे नसलं तरी दबक्या आवाजात दोन्ही पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.