मुंबई -राज्यात दलितांवर अत्याचार होत आहेत. हे अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकारला यश आलेले नाही. मराठा, ओबीसी आणि मुस्लीम समाजाचे आरक्षण देण्यात सरकार कमी पडले आहे. या समाजांना न्याय देता येत नसेल तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, अशी टीका आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
पदोन्नत्तीत आरक्षण
विविध समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज आरपीआयच्या वतीने रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला, यादरम्यान आठवले पत्रकारांशी बोलत होते. कोविडची परिस्थिती असल्याने लॉकडाऊन आहे. कोरोनाची परिस्थिती आहे, यामुळे मोजक्या लोकांमध्ये आंदोलन करण्यात आले. दलित आदिवासी समाजाला १९५०पासून पदोन्नतीत आरक्षण मिळत होते. ते आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने थांबवण्यात आले आहे. कोर्टाने राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार दिले, मात्र आघाडी सरकारने आमच्यावर अन्याय केला आहे. राज्य सरकारने आरक्षण दिले नसले तरी कर्नाटक सरकारने आरक्षण दिले आहे. राज्य सरकारनेही कर्नाटकच्या धर्तीवर पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली.