मुंबई :धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना तोल गेल्याने पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण आरपीएफ कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे वाचल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली रेल्वे स्थानकात धावत्या गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल गेला. प्रवासी ट्रेनखाली जाणार तोच तिथं तैनात असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबलने प्रसंगावधान दाखवून प्रवाशाचा जीव वाचविला. हा थरारक प्रसंग रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
अर्रर्र... हुश्य!! थोडक्यात वाचला जीव, RPF जवानाचे प्रसंगावधान आले कामी, बघा VIDEO - धावती रेल्वे पकडताना अपघात
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली रेल्वे स्थानकात धावत्या गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल गेला. प्रवासी ट्रेनखाली जाणार तोच तिथं तैनात असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबलने प्रसंगावधान दाखवून प्रवाशाचा जीव वाचविला. हा थरारक प्रसंग रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
अशी घडली घटना
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ट्रेन क्रमांक ०२९०४ गोल्डन टेम्पल एक्सप्रेस आली होती. ठरलेल्या वेळेनंतर ही रेल्वे गंतव्य स्थानकाकडे रवाना होत होती. रेल्वे सुरू झाल्यानंतर एक प्रवासी रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र याच वेळी त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. यावेळी तो ट्रेनखाली जाणार तोच कर्तव्यावर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल विनीत कुमार यांनी प्रसंगावधान राखून तातडीने त्या प्रवाशाकडे धाव घेतली आणि त्याला सुरक्षितपणे बाजूला खेचले. हा संपूर्ण थरार स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान घडली आहे.
थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल
थरकाप उडविणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेत प्रवाशाच्या जीव वाचवणारे आरपीएफ कॉन्स्टेबल विनित कुमार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विनित कुमार सांगतात की, ही ट्रेन पकडताना त्या प्रवाशाचा तोल गेला. तो ट्रेनखाली जाणारच होता, यावेळी लगेच त्या प्रवाशाला बाहेर ओढले आणि त्याचा जीव वाचला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना धावती ट्रेन न पकडण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा -प्रवाशांनो रेल्वेने प्रवास करताय.., 'अशा' प्रकारे होतेय तुमची फसवणूक