मुंबई - रस्त्यांवरील दृश्यमानता वाढावी, वाहनचालकांना सुरक्षित रितीने वाहन चालविता यावे, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे यासाठी मुंबई महानगरातील रस्त्यांवरील दुभाजकांची रंगरंगोटी केली जात आहे. रस्ते सुरक्षितता वाढविण्यासाठी दुभाजकांसह पदपथांच्या कडेला असणारे दगडही रंगवले जात आहेत. (Road Beautification In Mumbai)तसेच प्रमुख रस्त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या भिंतीवरही कलात्मक चित्रे रंगवून सुशोभीकरण केले जात आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई रस्त्याचे सुशोभीकरण -
रस्त्यांवरील दृश्यमानता वाढावी, वाहनचालकांना सुरक्षित रितीने वाहन चालविता यावे, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे या दृष्टिने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री व उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका बैठकी दरम्यान दिले होते. (reduce the number of accidents Road Beautification In Mumbai) त्यानुसार महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांना सूचना केल्या. ज्या रस्त्यांवर मध्यवर्ती दुभाजक आहेत. त्यांची स्वच्छता करुन नव्याने रंगरंगोटी करणे, दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजक बांधणे, दुभाजकांमध्ये हिरवळ वा फुलझाडांची लागवड करणे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, प्रमुख रस्त्यांवरील आजुबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी करणे, चित्रे रेखाटणे आदी कामे हाती घेण्यात याव्यात अशा सूचना करण्यात आल्या होत्या.