मुंबई- सक्त वसुली संचालनालय ( Enforcement Directorate ) ऋषिकेश देशमुख ( Hrushikesh Deshmukh ) यांना कथित 100 कोटी घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात न जाता त्यांनी मुंबई विशेष PMLA न्यायालयात ( PMLA Court ) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सोमवार (दि.24 जानेवारी) सुनावणी झाली. ऋषिकेश देशमुख यांच्याकडून ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. ऋषिकेश देखमुख यांना न्यायालयाने दिलासा दिला नसून पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे जामीन अर्जासाठी देशमुख यांना तारीख पे तारीख मिळत असल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे.
ऋषिकेश देशमुख यांना ईडीने 5 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहाण्याबाबत समन्स पाठवले होते. मात्र, ऋषिकेश देशमुख या चौकशीला हजर राहिले नसून त्यांनी पंधरा दिवसांची वेळ मागितली. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आली. दुसऱ्यादिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला ऋषिकेश देशमुख यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
कथित शंभर कोटी प्रकरणात अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना ईडीडून अटक करण्यात आली होती. तब्बल 80 दिवसांपासून अनिल देशमुख हे तुरुंगात आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA न्यायालयात ईडीने सात हजार पानाचे पुरवणी आरोपपत्रही दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांनाही सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
काय आहे प्रकरण..?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला ( Sachin Waze ) प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे.