मुंबई- महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही तर अद्वितीय राज्य असून देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे, या राहुल गांधी यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. केंद्र सरकारने तत्काळ महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. महसुली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे आणि रोजगाराचे केंद्र आहे. पण, केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्ये जी अडचणीत आली आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. महाराष्ट्रासह इतर राज्ये कोरोनाचा मुकाबला करत आहेत, त्यांना केंद्र सरकारने भरीव मदत केलीच पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे थोरात म्हणाले.