मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव शहरांमध्ये वाढत असताना अनेक नागरिकांनी गावाकडे धाव घेतली आहे. मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक गावकऱ्यांनी शहरातील लोकांना प्रवेशबंदी केली आहे. यामुळे नागरिकांवर वेगळेच संकट ओढवल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. पोलिसांना त्यांचे काम करू द्या, असा इशारा गावकऱ्यांना दिला आहे.
''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''
कोरोनापासून वाचण्यासाठी शहरातील लोक ग्रामिण भागाकडे वळले आहेत. मात्र अनेक गावामध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांना गावबंदी करण्यात आली आहे. लोकांना शहरातून बाहेर पडून गावी न जाता घरी थांबावे व ग्रामीण भागातील लोकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
''शहरातील काही नागरिक गावाकडे निघालेत. ही धावपळ, पळापळ कशासाठी? तुम्ही जेथे आहात तिथेच सुरक्षित राहा. तुम्हाला जीवनावश्यक सुविधा पुरवायला शासन कटिबद्ध आहे. यातून नवे वाद होतील, प्रशासनावर ताण निर्माण होईल. माझी विनंती आहे आपण धावपळ करून गावाकडे जाण्याचा प्रयत्न टाळावा. शहरातील नागरिक गावाकडे आल्याने काही ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होतेय. गावकरी बांधवांना माझी विनंती आहे. आपण काळजी घ्या, मात्र कायदा हातात घेऊ नका, पोलिसांचे काम पोलिसांना करू द्या,'' असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.