मुंबई-मराठा समाजातील तरुणांच्या विविध विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील निवृत्त सनदी अधिकार्यांची संचालक म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. तसेच या संस्थेच्या कामकाजात इतरांचा हस्तक्षेप राहू नये म्हणून सरकारकडून सारथीला स्वायत्ततेचा दर्जाही देण्यात आला आहे. यासाठीचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे.
सारथीला स्वायत्तता देण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली हेाती. तसेच सारथी संस्थेवर मराठा समाजातील व्यक्तींची नेमणूक करावी अशीही मागणी अलिकडे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान केली होती. त्यापार्श्वभूमीवर सरकारने जीआर काढून मराठा समाजातील माजी सनदी अधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या अगदी मर्जीतील माजी सनदी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अजित निंबाळकर यांची सारथीच्या अध्यक्ष आहेत. त्यासोबतच आता माजी अधिकारी मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट आणि नवनाथ पासलकर हे सर्व निवृत्त अधिकारी यांचीही सारथीवर वर्णी लावण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी उपमुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत. तसेच पुणे विभागीय आयुक्त, कौशल्य विकास आयुक्त, शालेय शिक्षण आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त आदी पुण्यातील विद्यमान अधिकारी शासकीय संचालक म्हणून संस्थेवर नियुक्त केले आहेत. सारथीत आता एकुण 12 सदस्यांचे संचालक मंडळ असून त्यामध्ये चार अशासकीय सदस्य आहेत. विशेष म्हणजे ते सर्व निवृत्त सनदी अधिकारी आहेत.