बारामती -राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर "शेतकरी योजना" या शिर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थींनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयची असून एकाच अर्जाव्दारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास पुन:श्च सुरूवात - शेतकरी योजना झाली सुरू
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास पुन:श्च सुरूवात केली आहे. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

सन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या प्रक्रीयेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सन 2020-21 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला आहे. मात्र, त्यांची कोणत्याही योजनेसाठी निवड झाली नाही, ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील. असे अर्ज सन 2021-22 करता ग्राह्य धरले जातील. त्याकरता त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही. सन 2021-22 करता वरील अर्जातील ज्या बाबींकरता अर्ज केलेला नाही, त्या बाबींचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करता येईल. महाडीटीबी पोर्टलवर "शेतकरी योजना" या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली असून या प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करायचा आहे.
महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. "वैयक्तिक लाभार्थी "म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल, त्या शिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई मेल वर किंवा 020 – 25511479 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, आवाहन तालुका कृषि अधिकारी डी.बी.पडवळ यांनी केले आहे.