मुंबई- कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने ( Third Wave of Corona ) राज्य सरकारने निर्बंध अधिक शिथिल केले ( Restrictions more Relaxed ) आहेत. मंगळवारी (दि. 2 मार्च) नवी नियमावली जाहीर केली. त्यात 14 जिल्ह्यातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा स्पर्धा, धार्मिक स्थळे पूर्णतः खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 25 टक्के क्षमतेच्या किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिल्याचे राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने नोव्हेंबरच्या अखेरीस डोकेवर काढले. दिवसागणिक झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली. ओमायक्रॉन व्हेरियंटचे ( Omicron Variant ) रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली होती. राज्य सरकारने खबरदारी घेत, नववर्षांच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच 10 जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू केली. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा स्पर्धा, धार्मिक स्थळे पूर्णतः बंद ठेवण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी संमेलन, लग्न समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थितीस बंदी घातली. लोकल प्रवासाकरिता दोन डोस अनिवार्य केले होते.
आता कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. काही दिवसांपासून राज्यभरातील रुग्ण संख्येत मोठी घसरण झाली आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर नवीन सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यात लसीचा पहिला डोस झालेल्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. तसेच पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आयसीयूमधील ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांहून कमी प्रमाणात भरलेले असतील, अशा जिल्ह्यांचा समावेश अ श्रेणीत करून त्या ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे राज्य शासनाने अधिसूचनेत नमूद केले आहे. त्यानुसार आज 14 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले आहेत.