मुंबई - 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी ठाणे, मुंबई आणि उपनगर परिसरातील दहीहंडी पथक सज्ज झाली आहेत. या पथकांकडून थरावर थर लावण्याचा सराव सुरू झाला आहे. राज्यात नव्याने आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने दहीहंडी उत्सवासहित सर्वत्र सार्वजनिक सण निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 वर्ष कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक सण साजरे केले जात नव्हते. कोरोनाच्या सावटामुळे गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे सण सार्वजनिकरित्या साजरे करता आले नव्हते. मात्र, यावेळी निर्बंधमुक्त सण साजरा करण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे होऊ घातलेल्या गोपाळकाला सणासाठी सर्वच दहीहंडी मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यावर्षी अनेक थर लावण्यासाठी दहीहंडी पथक सराव करत आहे.
दहीहंडी पथकांचा जोरदार सराव -गेल्या 2 वर्षे राज्यासह देशभरात कोरोनाची भीती होती. त्यामुळे दहीहंडी उत्सव साजरा करता आलेला नाही. मात्र, यावर्षी निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी होत असल्याने मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी एकावर एक मानवी मनोरे रचण्याचा जोरदार सराव सुरू केला आहे. समर्थ नगर, जोगेश्वरी पूर्व येथील आर्यन गोविंदा पथकाने 2 वर्षाच्या कोरोना काळातील बंदीनंतर मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा सराव सुरू केला आहे. गेल्या 12 वर्ष हे गोविंदा मंडळ मुंबई तसेच मुंबई परिसरातील दहीहंडी उत्सवात भाग घेत असतं. 2019 यावर्षी शेवटची दहीहंडी खेळल्यानंतर गेली, 2 वर्ष सर्वच मंडळ आतुरतेने निर्बंधमुक्त दहीहंडी उत्सवची वाट पाहत होते.
नियमांचं बंधन नसावं -या वर्षी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे निर्बंधमुक्त दहीहंडी खेळता येणार आहे. त्यासाठी सर्वच दहीहंडी पथक सज्ज झाली आहेत. आर्यन गोविंदा मंडळातली मुलं रोज आपली काम आटपून रात्री सरावाला सुरुवात करतात. गोविंदा उत्सव साजरा करताना नियमांचं बंधन नसावं. स्पेनमध्ये ही सहाशे स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळेस मानवी मनोरे लावले जातात. त्या वेळेस उंच अंतरावर लहान मुलांनाच चढवलं जातं. त्याचप्रमाणे गोविंदा उत्सव साजरा करताना लहान मुलांना वर तळण्याची अनुमति असली पाहिजे. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असल्याचं गोविंदा पथकाचे प्रशिक्षक निखिल नांदगावकर म्हणतात. यासोबतच यावेळी गोविंदा पथकांना 10 लाखाचा विमा देण्याचा जो विचार सुरू आहेत, याचा देखील स्वागत त्यांच्याकडून करण्यात आला आहे.