मुंबई - घाटकोपर पश्चिममधील दामोदर पार्कजवळ असलेल्या सिद्धी-साई इमारत दुर्घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने १७ जणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी घटनास्थळाला भेट दिल्यावर मुख्यामंत्र्यांनी इमारत एका वर्षात उभारली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षात या इमारतीची एकही वीट रचली न गेल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. तसेच इमारतीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील नर्सिंग होमचे नूतनीकरण करताना इमारतीमधील खांबांच्या मूळ रचनेला धक्का लागल्याचे पंचनाम्यात समोर आले होते.
इमारतीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. दुर्घटनास्थळाला भेट दिल्यावर, भाजपचे नगरसेवक पराग शाह यांच्या मन बिल्डर्स मार्फत वर्षाभरात इमारत उभी करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिल्याने घरे परत मिळण्याची आशा येथील रहिवाशांना होती. मात्र, दोन वर्षाचा कालावधी लोटल्यावरही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.
दुर्घटनाग्रस्त सिद्धी-साई इमारतीच्या बाजूलाच राजेश जैन नामक विकासकाचे काम चालू आहे. या विकासकाने सिद्धी-साई इमारतीच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये घुसखोरी केल्याने मूळ ४९० चौरस मीटर असलेले इमारतीचे क्षेत्रफळ आता ३५९ चौरस मीटर इतकेच राहिले आहे. रहिवाशांनी घटनेचा पाठपुरावा केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याचे विरेंद्र सिंह यांनी सांगितले.
दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना भांडुपमधील जंगल मंगल रस्त्यावरील भट्टीपाडाच्या एसआरए इमारतीमध्ये तात्पुरते निवासस्थान देण्यात आले. मात्र, येत्या सप्टेंबर महिन्यात हा कालावधी संपणार आहे. यामुळे इमारतीची पुनर्बांधणी होईपर्यंत घाटकोपर भागातच पर्यायी घरे द्यावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
सुनील सितप अद्यापही तुरुंगातच -
सिद्धी-साई इमारतीच्या तळमजल्यावर सुनील सीताप या शिवसैनिकाचे प्रसूतिगृह होते. त्याचे बांधकाम सुरु असताना सिताप यांनी इमारतीचे खांब काढून त्या ठिकाणी लोखंडी चॅनल लावले. हे लोखंडी चॅनल इमारतीचा भार पेलू न शकल्याने इमारत कोसळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सुनील सिताप यांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी सीताप तुरुंगात आहे.