मुंबई -कांदिवली पश्चिम मध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत लस देण्यात आली आहे. या सर्व नागरिकांना कांदिवली पश्चिम मध्ये महावीर नगर परिसरातील अॅमिनिटी मार्केटमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवून महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीमधील बोगस लसीकरण प्रकरणात लस घेतलेल्याची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेने त्यांना लसीकरण केले आहे. कांदिवलीतील महावीर नगर परिसरातील अॅमिनिटी मार्केट महापालिका लसीकरण केंद्रावर या नागरिकांसाठी खास सत्र आयोजित करण्यात आले होते. पोलिसांकडून मिळालेल्या यादीनुसार ३९० नागरिकांना लस देण्यात येणार होती. मात्र यापैकी बहुसंख्य रहिवाशांनी आधीच्या बनावट लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने यापूर्वीच लस घेतल्याचे समोर आले. त्यामुळे अद्याप लस न घेतलेले १२८ रहिवाशांचे लसीकरण शनिवारी करण्यात आले.
महापालिकेने पडताळणी करून बोगस लसीकरण प्रकरणातील ज्या नागरिकांना आता लस दिली आहे. त्यांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस देण्यात येणार आहे. कांदिवलीमधील रहिवाशांना लस दिल्यानंतर आता उर्वरित आठ ठिकाणी बोगस लसीकरणाचा फटका बसलेल्या नागरिकांना लस देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.