मुंबई- मुंबईसह राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आज स्पष्ट होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्यावतीने आरक्षणाची लॉटरी आज(बुधवार) काढली जाणार आहे. लॉटरीमध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती पुरुष की ओबीसी पुरुष याची लॉटरी निघणार आहे. याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने या लॉटरीची माहिती राज्यपाल, निवडणूक विभाग तसेच राज्याचा विधी व न्याय विभाग यांना माहिती देऊनच ही लॉटरी काढावी लागणार आहे.
हेही वाचा -'भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट घेतला, आता 'नीळकंठ' होण्यास तयार'
१९९७- ९८ पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा कालावधी एक वर्षाचा होता. १९९८ - ९९ मध्ये राज्यात महापौर परिषद स्थापन करण्यात आली. एकाच वर्षात महापौर परिषद रद्द करून महापौर पदासाठी अडीच वर्षाचा कालावधी करण्यात आला. मुंबईचे महापौरपद १९९९ मध्ये ओबीसींसाठी, २००२ मध्ये अनुसूचित जातीसाठी, २००५ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी, २००७ मध्ये ओबीसी महिलेसाठी, २००९ मध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी, २०१२ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी, २०१४ मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी २०१७ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबईत अनुसूचित जमतीमधील नागरिकांची संख्या कमी असल्याने त्यांचे दोनच नगरसेवक महापालिकेत आहेत. याकारणाने गेल्या २० वर्षात अनुसूचित जमातीला एकदाही महापौर पद भूषवता आलेले नाही. यामुळे अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती किंवा ओबीसी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -घाटकोपरच्या महिला महाविद्यालयातील युवती करणार काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास