महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धरणांमध्ये मागील वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा; मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार - water storage in dam of mumbai

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने 419318 दशलक्ष लिटर इतकाच पाणी साठा जमा आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना तीन ते साडेतीन महिने पुरेल इतकाच आहे.

धरण
धरण

By

Published : Jul 23, 2020, 8:38 PM IST

मुंबई - मायानगरीला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस कमी पडत आहे. पावसाळ्यातील दोन महिने संपत आले असताना मागील वर्षांपेक्षा धरणामध्ये 40 टक्के पाणीसाठा कमी आहे. मुंबई आणि मुंबई परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाचे अद्यापही दोन महिने बाकी आहेत. यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये वर्षभरासाठी लागणारा पाणीसाठा जमा झाला नाही तर मुंबईकरांवर आता पाणी कपातीची टांगती तलवार आहे. पाणी कपातीचा प्रस्ताव आल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

मुंबईला तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला रोज 3750 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्याप्रमाणे वर्षभरासाठी 14 लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा धरणामध्ये जमा असावा लागतो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने 419318 दशलक्ष लिटर इतकाच पाणी साठा जमा आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना तीन ते साडेतीन महिने पुरेल इतकाच आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 419318 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा आहे. मागीलवर्षी याच वेळी 2019 ला हा पाणीसाठा 785088 दशलक्ष लिटर एवढा होता. मागील वर्षापेक्षा यावर्षी 40 टक्के पाणीसाठा कमी आहे. त्याआधी 2018 ला या दिवशीचा पाणीसाठा 1180341 दशलक्ष लिटर एवढा होता. धरण क्षेत्रात पाऊस हा कमी झाल्याने पाण्याची पातळी दरवर्षीपेक्षा कमी आहे, अद्याप प्रशासनाने पाणीकपातीचा कोणताही प्रस्ताव आणला नसला तरी सध्याची पाणीसाठ्याची स्थिती पहाता असा प्रस्ताव येत्या काळात आणला जाऊ शकतो. त्यामुळे यंदा मुंबईकरांना कोरोनासोबतच पाणीकपातीच्या संकटालाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता पाणी कपातीचा अद्याप कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. असा प्रस्ताव स्थायी समिती आणि पालिका सभागृहात आल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची सध्याची पाणी पातळी -

अप्पर वैतरणा - 20586 दशलक्ष लीटर

मोडक सागर - 48223 दशलक्ष लीटर

तानसा - 34839 दशलक्ष लीटर

मध्य वैतरणा - 55085 दशलक्ष लीटर

भातसा - 235791 दशलक्ष लीटर

विहार - 16846 दशलक्ष लीटर

तुलसी - 7949 दशलक्ष लीटर

एकूण - 419318 दशलक्ष लीटर

हेही वाचा -राज्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज


ABOUT THE AUTHOR

...view details