महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नालेसफाई करून काढण्यात आलेला गाळ तातडीने हटवा; पालिका आयुक्तांचे आदेश - Mumbai Mnc ready for rainfall Iqbal Chahal

मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबत दरवर्षी प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. पालिकेने नाले सफाई केली तरी दरवर्षी मुंबईची तुंबई होते. पावसापूर्वी नालेसफाई करून काढण्यात आलेला गाळ तसाच पडून राहिल्यास पाण्याचा निचरा होणे कठीण जाते. त्यामुळे, काढण्यात आलेला गाळ तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

Mumbai Mnc ready for rainfall Iqbal Chahal
नालेसफाई गाळ हटवा इकबाल सिंह चहल

By

Published : Jun 8, 2021, 7:54 PM IST

मुंबई -मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबत दरवर्षी प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. पालिकेने नाले सफाई केली तरी दरवर्षी मुंबईची तुंबई होते. पावसापूर्वी नालेसफाई करून काढण्यात आलेला गाळ तसाच पडून राहिल्यास पाण्याचा निचरा होणे कठीण जाते. त्यामुळे, काढण्यात आलेला गाळ तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच, पावसाळ्यासाठी महापालिका सज्ज झाली असून पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

हेही वाचा -दक्षिण मुंबईत 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक, म्हाडाकडून यादी प्रसिद्ध

आढावा बैठक

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पावसाळ्यासाठीच्या तयारीबाबत झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, 'बेस्ट' उपक्रमाचे महाव्यवस्थापक, सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, तसेच मुंबई पोलीस, मध्य व पश्चिम रेल्वे, म्हाडा, एमएमआरडीए, मुंबई मेट्रो संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये पर्जन्य जल वाहिन्या खात्यातील टीम तैनात करण्यात आली आहे. ज्या परिसरांमध्ये पाण्याचा निचरा कमी वेगाने होत असल्याचा अनुभव आहे, अशा सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून डिझेलचा पुरेसा साठा असल्याची खातरजमा वेळोवेळी करण्यात येत आहे. याबाबत सर्व विभागांमध्ये रंगीत तालिम देखील घेण्यात आली आहे.

मॅनहोलची तपासणी

महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी पावसाळी जाळ्या आहेत, तसेच पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणाऱ्या पावसाळी जाळ्या आदींची तपासणी विभाग स्तरावर वेळोवेळी करण्यात यावी. पावसाळी जाळ्यांबाबत साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घ्यावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. ज्या ठिकाणी 'मॅनहोल' आहेत, शिवाय ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणारे मॅनहोलची तपासणी केली जाणार आहे. साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घेतले जाणार आहेत.

प्रमुख रुग्णालयांमधील परिसरात पाणी साचू नये यासाठी यंत्रणा

गेल्यावर्षी पावसाळ्यादरम्यान मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय व 'बी' विभाग कार्यक्षेत्रातील जे.जे. रुग्णालय या २ महत्वाच्या व मोठ्या रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे, येथे पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने सक्षम व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच, जम्बो कोविड रुग्णालयांच्या स्तरावरही वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला जाणार आहे.

सहाय्यक आयुक्त दररोज पाहणी करणार

मुंबईत सखल भागात दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे, पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळापूर्व नालेसफाई, मॅनहोलवर जाळ्या, वृक्ष छाटणी आदी कामे केली जातात. पावसाळ्यात आपापल्या कार्यक्षेत्रात याकडे लक्ष वेधून नियमित पाहणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले.

मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स

मुंबई मेट्रोची कामे ज्या ठिकाणी सुरू आहेत, त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून घेण्याची कार्यवाही योग्यप्रकारे झाली असल्याची खातरजमा करवून घ्यावी. तसेच, महापालिकेच्या सर्व उपआयुक्त, सह आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर मुंबई मेट्रो, एम.एम.आर.डी.ए, म्हाडा, मुंबई पोलीस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि संबंधित संस्थांसोबत संयुक्त बैठकांचे तातडीने आयोजन करून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. तसेच, धोकादायक इमारतींबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करवून घेण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले.

तात्पुरता निवाऱ्याची व्यवस्था

आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग म्हणून सर्व २४ विभागांत तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर ठिकाणची संभाव्य गरज लक्षात‌ घेऊन अन्न व पाण्याच्या व्यवस्थेचेही नियोजन केले जाणार आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या स्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजन याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.

हेही वाचा -राज्यातील बंद उद्योगांना मिळणार ‘अभय’ योजनेचा दिलासा

ABOUT THE AUTHOR

...view details