मुंबई- लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनता ईव्हीएमच्या विरोधात प्रचंड संतापलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. म्हणून निवडणूक आयोगाने या मागणीचा तत्काळ विचार करावा, अशी मागणी मुंबईत इव्हीएम विरोधी अभियानाचे प्रमुख रवी भिलाणे यांनी केली.
विधानसभा निवडणुका बॅलेटवर घ्या... मुंबईत आझाद मैदानासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी ईव्हीएम विरोधातील आंदोलन छेडण्यात आले. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी, साहित्यिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी ईव्हीएम विरोधातील नारे देत राज्यातील विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी जोरदार मागणी लावून धरली.
यावेळी या आंदोलनाचे प्रमुख रवी भिलाने म्हणाले, आम्हाला राज्यातील विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएमवर नको तर ती बॅलेट पेपरवर हवी आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएम विरोधात उठाव केला आहे. तसेच आज राज्यातील सुमारे 20 जिल्ह्यांमध्ये ईव्हीएमविरोधातील आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत आझाद मैदानात आलेल्या प्रत्येक तरुण आणि नागरिकांना एकच वाटते की या राज्यात मतदान हे ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावे. राज्यातील जनता ईव्हीएम विरोधात प्रचंड संतापलेली आहे. त्यामुळे उद्या मतदारांनी ही मशीन तोडली तर त्याला दोष देऊ नका, कारण तशी परिस्थिती तयार झाली असल्याचेही रवी भिलाने यांनी सांगितले.
दरम्यान, या आंदोलनातील फिरोज मिठीबोरवाला म्हणाले की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात आवाज दिला. परंतु त्यांचा आवाज 'ईडी'ने दाबला आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचा ईव्हीएमसाठी विरोध आहे. परंतु सर्वच नेते समोरून बोलण्यासाठी घाबरतात. त्यामुळे आम्ही आमचा हा लढा सुरु ठेवला असून यापुढेही तो चालूच राहील आणि तो एक जनतेचा लढा असेल असे मिठीबोरवाला म्हणाले.