मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व प्रकारची खबरदारी घेतली आहे. सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
चक्रीवादळासाठी जनतेने घाबरून जाऊ नये, योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे - विजय वडेट्टीवार - cyclone news
चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन एनडीआरएफच्या सहा तुकड्या मुंबईसह कोकणात सिंधुदुर्गपर्यंत तैनात करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यासाठी दोन तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक एनडीआरएफचे पथक संबंधित जिल्ह्यामध्ये पोहोचल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.
हवामान खात्याने आणि केंद्र सरकारच्या सल्लागार मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या चक्रीवादळासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारकडून मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई उपनगर आदी भागांत सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रातून निर्माण होणार हे चक्रीवादळ मुंबईतील दक्षिण-पूर्व, मध्य-पूर्व या भागात धडकण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा कोकण किनारपट्टीवरून उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने त्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर कोणत्याही मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात जाऊ नये, त्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
हेही वाचा -जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयातील मृत्यूंची टास्क फोर्समार्फत चौकशी