मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. ही लाट थोपविण्याच्या उपाययोजना राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वीक एंड लॉकडाऊनही लावण्यात आला. मात्र या लॉकडाऊनला विरोध होत आहे. राज्यातील कोरोनाच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबींचा हा आढावा...
व्यापाऱ्यांचा विरोध
राज्यातील या मिनी लॉकडाऊनला व्यापारी महासंघ विरोध करीत आहे. 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी साताऱ्यातील व्यापार्यांनी केली आहे. मुंबईतील व्यापारी संघटनानी एक पत्रक काढून लॉकडाऊन करू नये, असे आवाहन केले आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने नवीन निर्बंधांना तीव्र विरोध केलाय. आम्ही विकेंड लॉकडाऊनला सहकार्य करायला तयार होतो. मात्र आता अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचे व्यवसाय बंद करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आमच्यावर सक्ती केल्यास आम्ही अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल सेवाही बंद करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही या लॉकडाऊनला विरोध केला आहे.
हेही वाचा -कोरोनाचा कहर : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आजपासून भाविकांसाठी बंद
खरेदीसाठी झुंबड
राज्यात नवे निर्बंध लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीही दादर मार्केटमध्ये तोबा गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. मंगळवारीही दादर मार्केटमध्ये गर्दी झाली. भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केल्याचे चित्र दादरमध्ये बघायला मिळाले. मडमाडमध्ये वाइनशॉपवर मद्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. तर नाशिकमध्ये उद्योग धंदे, सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर 40 टक्के वर्दळ दिसून येत आहे.