३० जानेवारी १९४८ ला अनेक बाजूंनी इतिहासाने कूस बदलली. त्याने महाराष्ट्राचे राजकारणही बदलले. या दिवशी महात्मा गांधीजींची दिल्लीत हत्या झाली. ही हत्या करणारा नथुराम गोडसे हा महाराष्ट्रातील ब्राह्मण होता.
राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ३ टक्के लोकसंख्या ब्राह्मणांची होती. त्यांचे संस्कृतीपासून ते राजकारणापर्यंत ऐतिहासिकरीत्या जवळजवळ सर्वच क्षेत्रांत वर्चस्व होते. या वर्चस्वाला प्रथम महात्मा फुले, शाहू महाराज यांनी आणि नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर विरोध केला. १९२० मध्ये पेरीयार यांच्या दक्षिणेतील स्वाभिमान चळवळीप्रमाणे महाराष्ट्रात ब्राह्मणेतरांची भक्कम चळवळ उभी राहिली. हिनेच नंतरच्या काळात 'शेतकरी आणि कामगार पक्षा'चा पाया घातला.
राज्यामध्ये मोठ्या काळापासून एक मोठा बदल घडून येण्याच्या उंबरठ्यावर होता. किंबहुना यासाठी योग्य संधी येण्याचाच अवकाश होता. गोडसेच्या त्या कृत्याने ही संधी मिळवून दिली. यामुळे राजकीय मंथनाला गती मिळाली. ब्राह्मणांना गांधीविरोधी, काँग्रेसविरोधी, लोकविरोधी ठरवून त्यांना पुढची अनेक वर्षे राजकारणातून बाहेर फेकून देण्यात आले. योगायोगाने, जेव्हा गांधीजींची हत्या झाली, तेव्हा मुंबई स्टेटचे मुख्यमंत्री बी. जी. खेर हे ब्राह्मण होते. ते कट्टर गांधीवादी होते. पण ते फिके पडले आणि ब्राह्मण राज्याच्या राजकारणापासून दूर झाले.
लवकरच, केवळ राज्य स्तरावरच नव्हे तर, पंचायत स्तरावरही ब्राह्मणांना सार्वजनिक पदांवर सक्रिय राहण्यापासून जवळजवळ निषिद्ध ठरवण्यात आले. हा ब्राह्मणांनी अनेक शतकांपासून चालवलेल्या सामाजिक बहिष्काराचा स्वतःवरच उलटलेला परिणाम होता.
दरम्यान, ब्राह्मणांच्या हकालपट्टीमुळे मोकळी झालेली जागा बहुतांशी मराठा समाजाने आणि त्यात काही प्रमाणात इतर मागासवर्गीयांपैकी माळी आणि भंडारी समाजाने व्यापली. ही स्थिती आताच्या २०१९ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत कायम आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आणि भाजपचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून लढण्याचे ठरवले आहे. जो ब्राह्मणांचा गड समजला जातो. पाटील हे कोल्हापुरातील मराठा समाजातील असून ते शाहू महाराजांच्या काळापासून मराठा राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत.
पाटील यांच्या निर्णयामुळे राज्यात वादळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या ब्राह्मण आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोथरूड या त्यांच्या मतदारसंघात बहुतांशी ब्राह्मण लोकसंख्या आहे. यामुळे अचानकपणे, ब्राह्मण महासंघाच्या स्वघोषित नेत्यांना संधी मिळाली आणि त्यांनी पाटील यांच्याविरोधात विधाने करण्यास सुरुवात केली. त्यांनी पाटील यांच्याविरोधात ब्राह्मण उमेदवाराला उभे करण्याची धमकीही दिली आहे.
यानंतर पाटील यांनी या नेत्यांची भेट घेऊन त्यांची समजूत घातली. गंमत म्हणजे, भाजपची निष्ठा असलेल्या आरएसएसमध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व असल्याचा आरोप होऊ लागला. अर्थातच, ब्राह्मण भाजपला धमकी देत आहेत, याचे बरेच अर्थ निघताहेत. असे झाले नसते तरच नवल. महासंघाने खरोखरच ब्राह्मणांचा कितपत पाठिंबा दर्शविला आहे, यात शंकेला मोठा वाव आहे.
मात्र, खरी बाब वेगळीच आहे. ती म्हणजे, १० वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रात एकही राजकीय पक्ष ब्राह्मणांच्या नावावर किंवा त्यांना पुढे ठेऊन राजकारण करण्याचा साधा विचारही करू शकत नव्हता. एवढे ठामपणे सांगायचे तर सोडूनच द्या. तेव्हा भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यापासून हा केवळ योगायोग राहिलेला नाही. हा प्रभाव वाढतच चालला आहे. मागील काही वर्षांत अनेक ब्राह्मण संस्था आणि संघटनांनी परशुराम जयंतीनिमित्त मोठ-मोठे मोर्चे काढले आहेत.
उशिरा का होईना, या संघटनानी ब्राह्मणांसाठी शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. आणि मागासवर्गीय समाजांना आरक्षण दिलेले असल्याने आपल्यालाही हा फायदा मिळावा यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे.
अशाच प्रकारे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा काढत ब्राह्मणांनी आरक्षण सर्वांसाठीच लागू करावे किंवा ते ब्राह्मणांनाही द्यावे, अशी मागणी केली. डॉ. आंबेडकरांच्या राज्यात ही पूर्वी कधीही न घडलेली अत्यंत अभूतपूर्व बाब आहे.
यापुढची बाब नक्कीच राजकीय आरक्षण ही असेल. अशा मागण्या त्यांना अजेंडा किंवा वादग्रस्त स्थिती निर्माण करून देतात. ज्या पद्धतीने कोथरूड येथील निवडणुकीने त्यांना अत्यंत प्रभावी दबावगट बनवण्याची संधी दिली. हा राज्याच्या राजकारणाला जातीय समीकरणांमधून कलाटणी देणारा क्षण ठरू शकतो. आणि याचे दूरगामी परिणाम होतील.