मुंबई -महाबळेश्वर येथे मागील २४ तासात ५८१ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या 48 तासांमध्ये महाबळेश्वरमध्ये 1000 पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना, कन्हेर धोम, बलकवडी, उरमोडी, तारळी धरणे व खोडशी बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने कोयना व धोम धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
महाबळेश्वरात सर्वाधिक पाऊस होण्याची दुसरी वेळ
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे कोकणात आणि साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 48 तासात 1078 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची दुसरी वेळ असून सर्वाधिक पाऊस ऑगस्ट २००८ मध्ये झाला असल्याची माहिती हवामान विभागकडून देण्यात आली आहे. महाबळेश्वरात धुवांधार पाऊस कोसळत आहे.
'येत्या 24 तासात राज्यात मुसळधार'
२३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये कालपासून कोसळणाऱ्या पावसांने पुरती वाताहत केली असून आत्तापर्यंत पावसामुळे राज्यभरात ४४ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पुढच्या २४ तासांमध्ये देखील हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.