मुंबई -शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे बंडखोर शिवसेना आमदारांच्या निशाण्यावर आल्यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही ( Criticism of Shiv Sena MP Sanjay Raut ) त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत अचानक शिवसेनेतील आमदार, खासदारांच्या निशाण्यावर, का यायला लागले? त्याची कारण जरी, अनेक असली तरी सुद्धा संजय राऊत यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे.
संजय राऊत यांनी गुंते वाढवले?कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे हे बंडखोरी ( Rebel Siv sena MLA ) करतील असं स्वप्नातही ठाकरे कुटुंबीयांनाच काय, तर एखाद्या शिवसैनिकालाही वाटलं नसेल. परंतु एकनाथ शिंदे यांची बंडखोरी ही साधीसुधी नसून तब्बल ४० शिवसैनिक आमदार सोबत घेऊन त्यांनी शिवसेना पक्षालाच खिंडार पाडलं. सध्याच्या घडीला शिवसेना पक्षाची झालेली ही वाताहात सावरायला किती वर्ष जातील, त्याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे. परंतु हे सर्व घडण्यामागे शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत हेच जबाबदार असून त्यांच्यामुळेच शिवसेनेची ही परिस्थिती झाली आहे, असा आरोप बहुतेक बंडखोर आमदारांनी केला आहे.
संजय राऊत लोकांची मन दुखावली -संजय राऊत आपली भूमिका दररोज वेगवेगळ्या भाषेत प्रकट करत आले आहेत. महाराष्ट्राची संस्कृती नसलेल्या भाषेत ते बऱ्याचदा बोलतात. त्यामुळे लोकांची मन दुखावली जातात. संजय राऊत यांनी कधी कुणाची आई काढली, कुणाला डुक्कर म्हणाले, कुणाचा बळी द्या म्हणाले असल्याचा आरोप बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार सुद्धा संजय रावतांवर निशाणा साधताना दिसून येत आहेत. कालच मातोश्रीवर झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार एनडीएच्या द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात संजय राऊत वगळता शिवसेनेच्या इतर खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शविला. परंतु, संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यावरून तिथे सुद्धा खलबत्त सुरू झाले होते. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यामध्ये हस्तक्षेप करत एक दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे सांगितले. त्या बैठकीतून सुद्धा संजय राऊत नाराज होऊन बाहेर पडले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
अडीच वर्षांनी हिंदुत्व कसं जागं झालं?२०१९ साली काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर केलेली महाविकास आघाडी ही अनैसर्गिक असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कदापि त्यांच्याशी आघाडी होऊ शकत नाही, अशी मंशा एकनाथ शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांची आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली, त्यादरम्यान ही बंडखोडी का करण्यात आली नाही? त्याचबरोबर २०१४ साली जेव्हा युती तोडली तेव्हा यातील एकही आमदार काही बोलला नाही. मग आता अडीच वर्षांनी हे हिंदुत्व जागं कसे झालं ? असा प्रश्न खुद्द संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर २०१९ मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री झालेल्या संदिपान भुमरे यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन लोटांगण घातलं होतं असेही संजय राऊत म्हणाले होते. 'तुम्ही होतात म्हणून हे सरकार स्थापन झालं. आमच्यासारख्या साध्या माणसाला मंत्रीपद भेटलं,' असं वाक्य ही संदिपान भुमरे यांनी केल्याचे राऊत म्हणाले होते. इतकेच नाही तर पुरावा म्हणून त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग ही आहे, असेही ते म्हणाले. अडीच वर्षांमध्ये सत्ता भोगल्यानंतर आता अचानक संजय राऊत हे टीकेचे धनी का बरे झाले? जे संजय राऊत सत्ता स्थापनेसाठी मायबाप होते तेच आता अडीच वर्षानंतर शिवसेनेची वाहतात करणारे सर्वेसर्वा कसे झाले? असा प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे.