मुंबई - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दररोज पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा हा दरवाढीचा सपाटा मंगळवारी देखील कायम राहिला. सलग १० व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल ८३.६२ रुपयांवर गेले असून डिझेलने ७३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीची कारणे ७ जूनपासून कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात येत आहे. आज मुंबईत पेट्रोल ८३.६२ रुपयांवर गेले. त्यात ४५ पैशांची वाढ झाली तर डिझेल ५७ पैशांनी महागले त्यामुळे डिझेलचा भाव प्रती लीटर ७३.२१ रुपये झाला. दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर ७६. ७३ रुपये झाला आहे. तर डिझेलचा दर ७४.६२ रुपये झाला आहे. सोमवारी तो ७४.०३ रुपये होता.
सोमवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल १ टक्क्याने वाढून ३६.४९ डॉलर झाला. लॉकडाऊनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली आहे. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. या दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमती वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला आहे. मागील दोन महिन्यांतील नुकसान भरून काढण्यासाठी येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेल आणखी महागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जागतिक बाजाराशी संलग्न आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेल दरांचा आढावा घेतला जातो व त्यानुसार दरवाढ केली जात आहे. यासोबतच इंधनाच्या दरात केंद्रीय आणि स्थानिक करांचा मोठा वाटा आहे. इंधनाच्या किमतीत जवळपास ७० टक्के कराचा समावेश आहे. ज्यात उत्पादन शुल्क, स्थानिक कर, व्हॅट अधिभार यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेल व्हॅटवरील अधिभार म्हणून प्रत्येकी २ रुपये वाढवले होते. अगोदरच टाळेबंदीने आर्थिक संकटात सापडलेल्या माल वाहतूकदार आता इंधन दरवाढीने बेजार झाले केले आहे.