मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला नव हिंदू पासून धोका असल्याचे सांगितल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा हात घातला आहे. राज ठाकरे यांच्या मागे भारतीय जनता पक्ष उभा राहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषणा दरम्यान हिंदुत्वाला इतर कोणापासून धोका नसल्याचे म्हटले. हिंदूत्वाला 'नवं हिंदू'पासून धोका असल्याचे वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या आधीही अनेक वेळा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरत राजकीय पक्षांनी मते मागण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांनी ,'नव हिंदू' या शब्दाचा वापर केल्याने हे 'नव हिंदू' कोण? आणि त्यांच्यापासून नेमका काय धोका आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार हेही वाचा-मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये हिजाब घातलेल्या महिलेला प्रवेश नाकारला; व्हिडिओ व्हायरल
हिंदुत्वाचा ठेका भाजपला दिला का?
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या, की हिंदुत्व म्हणजे एका मागून एक राज्यातील सरकार काबीज करायचे आणि तेथील लोकांना हिंदुत्वाच्या नावावर त्रास द्यायचा हे हिंदुत्व नाही. भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाची व्याख्या कधी कळलीच नाही. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्राथमिक वर्गात जाऊन हिंदुत्वाची व्याख्या काय? हे समजून घ्यावे लागेल. हिंदुत्व म्हणजे केवळ मॉबलिंचिंग करणे, तेथील लोकांना त्रास देणे हे हिंदुत्व आहे का? अशा नव हिंदूपासून हिंदुत्वाला धोका असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या कायंदे यांनी व्यक्त केले आहे. तसेच गुरु माँ कांचन गिरी यांनी सोमवारी (18 ऑक्टोबर रोजी ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, ही भेट घडवून आणण्यामागे भारतीय जनता पक्षाने सूत्र हलवले असल्याचा आरोपही मनीषा कायंदे यांनी केला आहे. तसेच आताच राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा मुद्दा कसा आठवला? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता परप्रांतीय बाबतची भूमिका बदललेली आहे का? यापुढे मनसे परस्परांसाठी पायघड्या घालणार आहेत का? असे सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा-कोट्यावधी रुपयांचे बनावट डिझेल विक्री, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक
आमच्या रक्तात हिंदुत्व
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा राज्यातील इतर निवडणुका समोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाबाबत बोलत नाही. हिंदुत्व आमच्या रक्तारक्तात आहे. त्यामुळे हिंदुत्वबाबत आम्हाला कोणी शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट हिंदुत्ववादी विचार हे केवळ राज ठाकरे हेच पुढे घेऊन जाऊ शकते, असे मतही मनसे नेते देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच गुरु माँ कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले. ते नक्कीच अयोध्याला जातील. तसेच कणखरपणे हिंदुत्वाचा मुद्दा मांडू शकतील. देशभरातील लोकांची इच्छा आहे, की राज ठाकरे हे आक्रमकपणे हिंदुत्व पुढे घेऊन येतील. असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-उत्तराखंड प्रलय- ऋषिकेशमध्ये गंगचे रौद्ररुप, शिवमुर्ती पाण्याने वेढली, बघा श्वास रोखून धरणारा VIDEO
राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत
विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले, की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे कोणी पुढे येत आहेत त्यांचे स्वागतच आहे. राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांचे बरेच अविष्कार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आयोध्याला गेल्यास हिंदुत्वाचा आवाज आणखी मजबूत होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नसानसामध्ये मध्ये हिंदुत्व आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत केले जात आहे. शिवसेनेने वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. अगदी काँग्रेसला पुरक अशा भूमिकादेखील शिवसेनेने घेतली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कधीही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला पूरक अशी भूमिका घेतली नसल्याची आठवण विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण यांनी करून दिली.
हिंदुत्वाचा विषय होऊ शकतो निवडणुकीचा मुद्दा?
काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या विषयावरून आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती. मंदिर आंदोलन असेल व इतर आंदोलन असतील यामध्ये मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलत नवी भूमिका समोर आणली होती. त्यानंतर आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचे महंताना आश्वासन दिले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे हिंदुत्वाच्या विषयावर निवडणुका लढवण्याचे संकेत आहेत. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती देखील होऊ शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.