मुंबई- स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत शेतकरी संघटनेशी घरोबा केला आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते रणजीत बागल, पुजाताई झोळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला.
यावेळी तुपकर म्हणाले, मला सदाभाऊंची रोज आठवण येत होती. सदाभाऊंनी प्रेम केले. मला लाल दिवा दिला. भाजप- शिवसेनेत प्रवेशाचा पर्याय होता. मात्र, शेतकरी चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी स्वच्छेने लोकांना घेऊन रयतमधे प्रवेश केला. शेतकरी चळवळीचा परीघ बदलला आहे. निव्वळ स्टंट करुन प्रश्न सुटत नाहीत. स्वाभिमानी सोडताना वेदना झाल्या. राजू शेट्टी यांच्याबद्दल मनात सदैव आदर राहील, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा -आपल्यामुळे शरद पवारांना या वयात त्रास होऊ नये म्हणून राजीनामा - अजित पवार
यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सत्तेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 5 वर्षात एकदाही शेतकऱ्यावर गोळी घातली नाही. सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेईल, तेव्हा सदाभाऊ पहीला सत्तेत बाहेर पडेल, असे त्यांनी सांगितले.
शेट्टी आणि खोत यांच्या वादात तुपकर हे शेट्टी यांच्या बाजूने राहिले. खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात तुपकर यांची महत्त्वाची भूमिका होती. तेच तुपकर आता खोत यांच्याशी सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. खोत यांच्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील गरवारे क्लब येथे पार पडली. तुपकर यांनी याच बैठकीत संघटनेतील इतर नेत्यासह प्रवेश केला.