मुंबई- मुंबई महापालिकेने 1 मे पासून 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना खासगी रुग्णालयात लस देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण केले जाते. या निर्णयावर राज्य सरकार आणि मुंबई महापालिका नागरिकांची फसवणूक करत असल्याची टीका भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. तर मुंबईकरांकडून पैसे घेऊन लसीकरणाला आमचा विरोध आहे. पालिकेने खासगी लसीकरण केंद्रांना पैसे देऊन मुंबईकरांना मोफत लस द्यावी अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना खासगी रुग्णालयात लस दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयात एका डोससाठी 250 रुपये घेतले जातात. एका व्यक्तीला दोन डोस द्यावे लागतात. यामुळे एका व्यक्तीला लस घेण्यासाठी 500 रुपये खर्च येणार आहे. हा भुर्दंड मुंबईकरांवर पडणार आहे. पालिका प्रशासन कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. पालिका आयुक्तांच्या या निर्णायाला काँग्रेसचा विरोध आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची मुंबई महापालिका आपली जबाबदारी झटकत आहे. सर्व मुंबईकर नागरिकांना मोफत लस मिळाली पाहिजे. पालिकेने या वयोगटातील नागरिकांच्या लसीसाठी लागणारा निधी खासगी लसीकरण केंद्राला देऊन मोफत लसीकरण करून द्यावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
मुंबईतील 18 वर्षावरील लाभार्थ्यांना मोफत लस द्या हेही वाचा-ठाण्यातील प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू
भाजपची टीका -
देशभरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. हे लसीकरण खासगी रुग्णालयातच केले जाईल, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. प्रभाकर शिंदे आम्हाला मोफत लस देऊ असे सांगण्यात आले आणि आज खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण केले जाईल सांगितले जात आहे. ही राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांची फसवणूक आहे. त्यांच काय चाललं आहे हे त्यांनाच माहीत नाही. अशी टीका प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा-मोठा अनर्थ टळला : परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळती, ऑक्सिजन प्लांटवर कोसळले झाड
काय आहे पालिका आयुक्तांचा आदेश -
देशातील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोविड प्रतिबंध लस देण्याची मोहीम 1 मे पासून सुरू होणार आहे. मुंबईत असलेल्या महापालिकेच्या आणि शासकीय अशा एकूण 63 केंद्रांवर ४५ वर्ष वयावरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकृत 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला आहे. 18 वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात आयुक्त चहल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा-काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..
सरकारच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही -
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, मुंबईत 18 ते 44 या वयोगटात अंदाजे 90 लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी 2 डोस याप्रमाणे सुमारे 1 कोटी 80 लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे हे सर्व कळीचे मुद्दे आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक कंपन्यांकडे देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत लसीकरण मोहिमेसंदर्भातील निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने महानगरपालिका पुढील कार्यवाही निश्चित करेल. असे असले तरी लसीकरणाची वाढती व्याप्ती पाहता नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, म्हणून निर्णय घेण्यात आले आहेत, असे चहल यांनी नमूद केले.