मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणार्या भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात ( Bhatsa Dam ) पाणी घुसल्याने मागील महिन्यात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे महापालिकेने मुंबईत १५ टक्के पाणी कपात ( Water Reduction In Mumbai ) केली. दुरुस्तीचे काम होईपर्यंत पाणी कपात लागू असेल, असे पालिका प्रशासनाने जाहिर केले आहे. मात्र, मुंबईच्या अनेक भागात महिना झाला तरी ६० टक्क्याहून अधिक पाणी कपात आहे. पाणी कपातीमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. याकडे पालिकेच्या प्रशासक पदावर बसलेल्या आयुक्तांनी त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी केली आहे.
मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम-
यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत पुरेसा पाणी साठा आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील वर्षभराचे पाण्याचे टेन्शन दूर झाले होते. मात्र, भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. बिघाड दुरुस्त होईपर्यंत ही कपात राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईच्या अनेक भागात उंचावर वसाहती वसल्या आहेत. त्यामुळे तेथे आधीच कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यात पाणी कपातीची भर पडली असल्याने येथील रहिवाशांचे हाल होत आहेत. डोंगर भागात राहणाऱ्या मालाड, मालवणी, कुर्ला, कांदिवली, कुर्ला, साकीनाका, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, मुलुंड, वाशीनाका, लाल डोंगर चेंबूर कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांची परवड कायम आहे. त्यात पाणी कपातीमुळे रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. प्रशासनाकडून १५ टक्के पाणी कपात करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक भागात ६० टक्के पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न केला जात होता. विविध सभांमधून समस्य़ांवर आवाज उठवला जात होता. मात्र, मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने सर्व समित्या, नगरसेवकपद रद्द झाले आहेत. माजी नगरसेवकांकडून प्रशासनाकडे विचारणा केली जात असली तरी तेवढा परिणाम होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
पाणी पुरवठ्यासाठी अद्याप पर्यायी व्यवस्था नाही-