मुंबई -शहराच्या स्वच्छतेचे नियोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या मुख्यालयातील सभागृहात उंदीर फिरत असल्याचे भाजपने निदर्शनास आणले आहे.
शहराच्या स्वच्छतेचे नियोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या मुख्यालयातील सभागृहात उंदीर फिरत असल्याचे भाजपने निदर्शनात आणले आहे. सोमवारी (१०फेब्रुवारी) सभागृहात कचरा व्यवस्थापनावर चर्चासत्र सुरू झाले. यावेळी भाजप नगरसेविका सेजल देसाई यांनी सभागृहात उंदीर असल्याचे निदर्शनास आणले. मागील बाजूस बसलेल्या नगरसेवकांच्या पायाखाली उंदीर फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित बाब अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निदर्शनास आणल्याची माहिती देसाई यांनी दिली. तसेच सभागृहाची स्वच्छता ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे.
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत देशभरातील स्वच्छता ठेवणाऱ्या पालिकांना पुरस्कार देण्यात येतात. या स्पर्धेत मागील चार वर्षे इंदौर पालिका पहिला क्रमांक मिळवत आहे. यामुळे मुंबईतदेखील हा पॅटर्न राबवण्यात यावा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली आहे. तसेच कचरा व्यवस्थापनावर नगरसेवकांना सूचना करण्यासाठी विशेष सभागृह बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पालिकेचे कामकाज चालत असलेल्या ठिकाणीच उंदीर फिरत असल्यास या ठिकाणी बसून स्वच्छतेचे धोरण ठरवण्यात काय अर्थ, असा प्रश्न उपस्थित होत आहे.