महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील 'या' रुग्णालयातही उंदरांनी कुरतडला होता रुग्णांचा पाय व डोळा - उंदरांनी कुरतडला डोळा

कांदिवली शताब्दी रुग्णालयातही एका महिला रुग्णाचा पाय तर दुसऱ्या महिलेचा डोळा कुरतडल्याचा प्रकार घडला होता. महापालिकेच्या रुग्णालयात उंदरांकडून रुग्णांचे अवयव कुरतडले जाण्याचे प्रकार काही वर्षाच्या कालांतराने पुन्हा घडल्याचे समोर आले आहे.

उंदरांनी कुरतडला
उंदरांनी कुरतडला

By

Published : Jun 22, 2021, 7:51 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या एका युवकाचा डोळा उंदराने कुरतडल्याचे प्रकार समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उंदराने रुग्णांना कुरतडण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. याआधीही कांदिवली शताब्दी रुग्णालयात एका महिला रुग्णाचा पाय तर दुसऱ्या महिलेचा डोळा कुरतडल्याचा प्रकार घडला होता. महापालिकेच्या रुग्णालयात उंदरांकडून रुग्णांचे अवयव कुरतडले जाण्याचा प्रकार काही वर्षाच्या कालांतराने पुन्हा घडल्याचे समोर आले आहे.

राजावाडीत उंदराने रुग्णाचा डोळा कुरतडला

श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला दोन दिवसापूर्वी मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर बाबतीची समस्या असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसून आले. त्यांनी डोळे तपासले असता डोळ्याला उंदराने कुरतडल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी रुग्णालयातील परिचारिकांना सांगितले. मात्र त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. आयसीयू तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा वावर आहे. प्रथम दर्शनी उंदराने चावा घेतला असल्याचे दिसत असून याबाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.

'या' रूग्णालयातही २ रुग्णांना कुरतडले होते

राजावाडी रुग्णालयातील प्रकारासारखाच प्रकार कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात ८ ऑक्टोबरला २०१७ रोजी समोर आला होता. रुग्णालयात उपचारासाठी दाखल शांताबेन जाधव या महिलेचा पाय उंदराने कुरतडले. ही महिला झोपेत असल्याने याबाबत तिला काहीच कळले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. तसेच प्रमिला नेरुळकर या रुग्णाचाही डोळा उंदराने कुरतडला होता. या घटनेनंतर महिलेला इंजेक्शन द्यायला हवे होते. मात्र असे न करता रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणायला सांगितले. रुग्णाच्या नातेवाइकाला डॉक्टारांनी १० रुपयात आणखी काय उपचार करणार, असेही सुनावले होते. हा प्रकार स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी निदर्शनास आणून चौकशीची मागणी केली होती.

हेही वाचा -Nipah In Maharashtra : महाबळेश्वरमध्ये वटवाघूळात आढळला अतिविषारी निपाह व्हायरस

ABOUT THE AUTHOR

...view details